नाशिक : गत काही दिवसांपासून शहर पोलिसांनी जुगार व मटका अड्डयांवर छापासत्र सुरू केले असून जुगा-यांवर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले जात आहेत़ त्यातच काही दिवसांपुर्वी पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्तांनी सराईत जुगार अड्डे चालकांवर तडीपारीची कारवाईदेखील केली़ पोलिसांच्या कारवाईचा ससेमिरा चुकविण्यासाठी जुगा-यांनी आता मोबाईलचा वापर सुरू केला आहे़ याच प्रकारे मोबाईलवर जुगार खेळणा-या दोघांना सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़
नाशिक शहरातील जुगा-यांवरील कारवाईमुळे जुगा-यांनी आपला मोर्चा आपला आॅनलाईन जुगारीकडे वळविला आहे़ विशेष म्हणजे या आॅनलाईन खेळाचा जुगारचा प्रचार करीत असून यामुळे पोलिसांपासून कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे सांगत आहेत़ मात्र, पोलिसांनी आता या आॅनलाईन जुगाराकडेही आपले लक्ष केंद्रीत केले आहे़ सातपूरच्या समृद्धी टी पॉईंटजवळील हॉटेल गावरान ठसका या बंद हॉटेलमागे मोबाईल हॅण्डसेटवर फनगेम नावाचा रौलेट बिंगो हा आॅनलाईन जुगार पैसे घेऊन खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़
सातपूर पोलिसांनी मंगळवारी (दि़१३) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मोबाईल हॅण्डसेटवर फनगेम नावाचा रौलेट बिंगो हा आॅनलाईन जुगार खेळणारे व खेळविणारे संशयित कृष्णा राजू कुमावत (वय २३, रा. भाजी मार्केट याडार्मागे, कुमावत चाळ, उपनगर, नाशिक) व विनोदकुमार बरियर मंडळ (वय ३०, रा. भाजी मार्केट याडार्मागे, कुमावत चाळ, उपनगर, नाशिक) या दोघांना ताब्यात घेतले़ या दोघा संशयितांकडून रोख रक्कम जप्त करण्यात आली असून पोलीस नाईक सागर कुलकर्णी यांच्या फिर्यादीनुसार जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दरम्यान, मोबाईलवरून आॅनलाईन रौलेट बिंगो खेळण्याचे तंत्रज्ञान जुगा-यांना अवगत झाल्याने हा प्रकार रोखण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे़