लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि.२२) ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सभा ऑनलाइन होणार असून सर्व सभासद व संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या दालनातून अथवा सोयीच्या ठिकाणाहून या ऑनलाइन सभेत सहभाग नोंदविता येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पापूर्वी होणाऱ्या या सर्वसाधारण सभेत सभासदांचा आपल्या गटातील विकासकामांसाठी निधी पदरी पाडून घेण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी विविध गटांतील सदस्यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे आतापासूनच रीघ लावण्यास सुुरुवात केली आहे. मात्र, सत्ताधारी गटाच्या सदस्यांकडून आपल्या गटातील प्रश्न व समस्या थेट सभेत मांडल्या जाण्याच्या शक्यता मात्र कमीच आहेत. आपल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना अडचणीत आणणारे प्रश्न मांडणाऱ्या सदस्यांचे आगामी निवडणुकांमध्ये तिकीट कापले जाण्याची भीती सदस्यांमध्ये असल्याचे दिसून येत आहे. तर, विरोेधकांकडून मात्र सत्ताधाऱ्यांना कोरोनासंदर्भातील उपाययोजनांसह आरोग्यसेवा व रखडलेली विकासकामे, पाणीपुरवठा योजनांसंबंधीच्या विविध समस्यांवर घेरण्याचा प्रयत्न होण्याचे संकेत दिसून येत आहे.