नाशिक : भगवान महावीर जयंतीनिमित्त यंदा सार्वजनिक कार्यक्रमांवर मर्यादा असल्या तरी घरोघर उत्साहात जन्मोत्सव साजरा करण्याचे नियोजन आहे. श्री भारतीवर्षीय दिगंबर जैन युवा महासभेच्या वतीने रविवारी (दि.२५) इंटरनॅशनल युवा महाजुलुसचे आयोजन करण्यात आले आहे.
या जुलुसमध्ये एकूण सतरा देशांतील हजारो जैनबांधव सहभागी हेाणार आहेत. तसेच १०८ साधू-संत सहभागी होणार आहेत. दुपारी तीन ते साडेपाच वाजेदरम्यान होणारा हा बहुधा जागतिक पातळीवरील जेैन समाजाचा प्रथमच इतक्या मोठा ऑनलाइन साेहळा आहे. या ऑनलाइन युवा महाजुलुस सोहळ्याचे उद्घाटन लोकसभेचे अध्यक्ष ओमजी बिर्ला यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय मंत्री प्रदीप जैन आदित्य, दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन, राज्य शासनातील मंत्री राजेंद्र येड्रावकर, आग्रा येथील महापौर नवीन जैन हे उपस्थित राहणार आहेत. कोटा येथील राकेशकुमार जैन हे सूत्रधार असणार आहेत. या ऑनलाइन सोहळ्यात नागरिक घरोघर जयंती उत्सव साजरा करणार आहेत. घरोघरी खास पोशाखात तयार झालेले नागरिक भगवान महावीर यांची पालखी काढणार असून, घराच्या परिसरात म्हणजे पार्किंग किंवा छतावर छोटेखानी स्वरूपात आरोग्य नियमांचे पालन करून उत्सवात सहभागी होणार आहेत. तसेच भक्तीदेखील सादर करणार आहेत. यात सहभागी होणाऱ्यांना उत्कृष्ट कुटुंब, उत्कृष्ट सजावट, उत्कृष्ट रांगोळी, सर्वोत्कृष्ट पालखी अशी बक्षिसेही देण्यात येणार आहेत, अशी माहिती महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष पारस लोहाडे यांंनी दिली.
इन्फो...
चांदवड येथे पंचवीस फूट उंचीचा पाळणा
भगवान महावीर जयंतीनिमित्ताने नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील मालसाणे येथे भव्य पंचवीस फूट उंचीचा पाळणा तयार करण्यात आला आहे. रविवारी (दि.२५) रात्री साडेसात वाजता या पाळण्याचे उद्घाटन होईल तसेच पंधरा राज्यांतील पंधरा महिला मंडळे पंधरा भाषांमध्ये पाळणा गीत सादर करणार असल्याची माहिती पारस लोहाडे यांनी दिली. हा सोहळाही झूमवर ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.