नाशिक : शिधापत्रिकाधारकांचे आधारक्रमांक संगणकाशी जोडून पॉस यंत्राच्या सहाय्याने रेशनच्या धान्य वाटपात नाशिक जिल्ह्याने सलग दुसऱ्या महिन्यात राज्यातील अव्वल क्रमांक कायम ठेवला आहे. गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या आॅनलाइन धान्य विक्रीत पुणे जिल्ह्या पाचव्या क्रमांकावर आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गैरप्रकार व काळाबाजाराला आळा घालण्यासाठी एप्रिलपासून पॉस यंत्राच्या सहाय्याने रेशनचे धान्य वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. ज्याचे आधारक्रमांक असेल त्यालाच धान्य देण्यात येत असल्यामुळे शिधापत्रिकेवर नावे असलेल्या व्यक्तींचा पॉस यंत्रावर अंगठा घेऊन धान्य वितरण केले जात आहे. नाशिक जिल्ह्यात सुमारे ७ लाख ५६ हजार शिधापत्रिकाधारक असून, त्यातील सुमारे ७४ टक्के शिधापत्रिकाधारकांना दरमहा पॉस यंत्राच्या सहाय्याने धान्याचे वाटप केले जात आहे. जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या दुर्गम भागात अजूनही इंटरनेट सेवा न पोहोचल्यामुळे या तालुक्यांमध्ये पारंपरिक पद्धतीनेच धान्याचे वाटप केले जात आहे. तरीही जुलैमध्ये जिल्ह्यातील ५ लाख ६० हजार ५१३ शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या सहाय्याने धान्याचे वाटप करण्यात आले आहे. एकूण धान्याच्या नियतनाच्या तुलनेत त्याची संख्या ७० टक्के आहे. नाशिकचे हे प्रमाण सर्वाधिक असून, त्याखालोखाल नगर जिल्ह्यात ५ लाख ११ हजार ५६०, कोल्हापूर जिल्ह्यात ५ लाख, ८ हजार ६८, जळगाव जिल्ह्यात ४ लाख ४८ हजार ३०० व पाचव्या क्रमांकावर पुणे जिल्ह्याने ४ लाख १८ हजार १८० शिधापत्रिकाधारकांनी आॅनलाइन धान्य वाटप केले आहे.
आॅनलाइन रेशन वाटपात नाशिक राज्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 5:25 AM