येवला : तालुक्यातील प्रमुख असलेला पैठणी व्यवसाय कोरोनाने आर्थिक अडचणीत सापडला आहे. मात्र, अनलॉकच्या टप्प्यात आॅनलाइन विक्रीने पैठणी विक्रेत्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने देशभर लॉकडाऊन व संचारबंदी लागू केली. देश व राज्यांसह जिल्हाबंदी, गावबंदीने सर्वच बाजारपेठा ठप्प झाल्या. परिणामी जागतिक बाजारपेठ मिळविलेल्या पैठणीवरही विपरीत परिणाम झाला. पैठणी उत्पादनासह विक्री थांबली. हजारो विणकर, कारागीर बेरोजगार झाले. अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात बाजारपेठा खुल्या झाल्या असल्या तरी कोरोनाच्या भीतीने ग्राहक पेठेत यायला तयार नाहीत. परिणामीपैठणी उत्पादकांसह विणकर - कारागीर आर्थिक अडचणीत सापडले आहेत. आॅनलाइन विक्रीमुळे या अडचणीतील कारागीर, उत्पादकांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे. कोरोना संसंर्गाच्या भीतीने अजूनही ग्राहक प्रत्यक्ष दुकानात येवून पैठणी खरेदीला प्रतिसाद देत नसला तरी आॅनलाईन डिझाईन, कलर पाहून व व्हिडीओ कॉल करून खरेदी होत आहे.ऐन लग्नसराईत कोरोनाचा प्रादुर्भावाने देशभर लॉकडाऊन व संचारबंदी लागू झाली. देवस्थान, पर्यटन बंद झालीत. परिणामी ग्राहक बाजारपेठेत येऊ शकला नाही. मार्च ते जुलै असा साधारणत: चार महिने व्यवसाय बुडाला. सुमारे शे-दीडशे कोटी रुपयांचे नुकसान झाले. याबरोबरच पैठणी व्यवसायातील २० हजार विणकर, कारागीर बेरोजगार झाले.देशबंदी, राज्यबंदीने रेशीम, जर आदी पैठणीसाठी लागणारा कच्चामाल उपलब्ध न झाल्याने उत्पादन थांबले. ग्राहक नाही, उत्पादित मालाला मागणी नाही. परिणामी आहे तो माल पडत्या भावाने विकावा लागला. आॅनलाइन विक्र ी सेवेतही कुरियर सेवा नियमित नसल्याने अनेक अडचणी येत आहेत. नियमित व्यवसायाच्या तुलनेत आॅनलाइन विक्र ीचा व्यवसाय हा दहा टक्केच आहे.
पैठणी व्यवसायाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी शासनाने स्थानिक स्तरावर सबसीडीने रेशीम, जर आदी कच्चा माल उपलब्ध करून दिला पाहिजे. शासनाने विणकरांना कर्जमाफी द्यावी, याबराबेरच विणकर, कारागीरांना अर्थसहाय्य किंवा व्यवसायासाठी नव्याने कर्जही उपलब्ध करून द्यायला हवे. - राजेश भांडगे, पैठणी विणकर, येवला