नाशिक : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून म्हणजेच मंगळवारपासून सुरू होत आहे. राज्य सरकार आणि शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी गेल्या वर्षाप्रमाणेतच यावर्षीही ऑनलाइन शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शालेय जगातील नव्या तंत्रस्नेही युगामध्ये नवीन मुला-मुलींची ‘एन्ट्री’ होणार आहे. मात्र, आदिवासी आणि दुर्गम भागातील अनेक विद्यार्थ्यांपर्यंत अद्यापही ऑनलाइन शिक्षणाच्या सोयी-सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यांच्या शिक्षणाचे काय होणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाला गेल्या वर्षभर सुटी मिळाली होती. मागील संपूर्ण वर्ष ऑनलाइन माध्यमातूनच विद्यार्थ्यांचे शिक्षण झाले. प्राथमिक शाळा प्रत्यक्ष भरल्याच नाही, तर माध्यमिक शाळा अवघ्या एक ते दीड महिन्यासाठी उघडल्या. पुन्हा कोरोनाचा प्रकोप वाढल्याने शाळा बंद करण्यात आल्याने परीक्षा न घेताच मुलांना पास करण्यात आले. आता या विद्यार्थ्यांचे पुढच्या वर्गाचे शिक्षणही ऑनलाइन पद्धतीनेच सुरू होणार आहे. शिक्षण विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून (दि.१५) नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला असून यावर्षीही पहिल्या दिवसापासूनच शाळेची ऑनलाइन घंटा ऑनलाइन पद्धतीनेच वाजणार आहे.
इन्फो-
ऑनलाइन अध्यापनासाठी शिक्षकांना प्रशिक्षण
विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी काहीही तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी शाळांनी इंटरनेट, वायफाय सिस्टिम, लॅपटॉप, कॉम्प्युटर अशा पायाभूत सुविधांची तयारी केली आहे. तसेच ‘गुगल क्लासरूम’ची निर्मिती केली आहे. अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी झूम किंवा गुगल मीट या अपवर विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला आहे. मागील वर्षाचा अनुभव घेता ऑनलाइन शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक, कर्मचाऱ्यांचे ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
इन्फो-
पाठ्यपुस्तके पीडीएफ स्वरूपात
‘बालभारती’ने इयत्ता पहिली ते बारावीच्या पाठ्यपुस्तकांच्या पीडीएफ विनामूल्य डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचप्रमाणे पाठ्यपुस्तकांमधील ‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून शिक्षण सोपे करण्याचा प्रयत्न केला आहे. एकूणच आजपासून शाळेला सुरुवात होतेय; पण ती केवळ ऑनलाइन स्वरूपात असणार आहे.
----
जिल्ह्यातील एकूण शाळा- ५६२६
जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी- १३,०७,०२२
जिल्ह्यातील एकूण शिक्षक- ४१,२१७