सायखेडा : दीपावली सणाच्या निमित्ताने विविध साहित्याची खरेदी बाजारपेठांमध्ये जाऊन करण्याला ग्राहकांकडून पसंती दिली जात होतीे; परंतु सध्या सर्वत्र ऑनलाइन खरेदीचा बोलबाला असल्याने तरुणाई व शिक्षितवर्गाकडून या ऑनलाइन खरेदीला अधिक पसंती दिली जात आहे. पर्यायाने दीपावली उत्सवामध्ये बाजारपेठेत असलेली गर्दी काही प्रमाणात घटत असल्याचे दिसून येत आहे. या ऑनलाइन खरेदीचा फटका बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना मात्र मोठ्या प्रमाणावर बसू लागला आहे. पूर्वी दीपावलीजवळ आली की पंधरवड्यापासून दीपावलीच्या खरेदीला नागरिकांकडून मोठी धावपळ केली जात होती. नवीन कपडे, फराळाचे पदार्थ, फटाके, नवीन इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक वस्तू याची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत होती. परंतु मागील काही काळामध्ये इंटरनेट वापराकडे सर्वसामान्य नागरिकांचा वाढता राहिल्याने व बाजारपेठांच्या स्पर्धेत ऑनलाइन विक्री व्यवसाय आल्याने अधिक तर नागरिक ऑनलाइन खरेदीला सध्या मोठ्या प्रमाणावर पसंती देत आहेत. यामुळे दिवाळीच्या निमित्ताने बाजारात खरेदीसाठी होणारी गर्दी कमी होत चालली असून, यामुळे उत्सवानिमित्त असणाऱ्या बाजारपेठा ग्राहकाअभावी ओस पडल्याचे चित्र पाहण्यासाठी मिळत आहे. ऑनलाइन खरेदीमुळे ग्राहकांना मोठी सूट मिळत असल्याने ग्राहकांकडे या खरेदीकडे कल वाढला आहे.ऑनलाइन खरेदीचे लोण ग्रामीण भागातहीशहरी भागामध्ये ऑनलाइन खरेदीला मोठे प्राधान्य दिले जात आहे. परंतु या ऑनलाइन खरेदीचे लोण सध्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर पसरत चालले असून, ग्रामीण भागातील तरुणांनादेखील या खरेदीची क्रेझ निर्माण झाली असून, शहरातील नातेवाइकांचे पत्ते देऊन या पत्त्यावर खरेदी साहित्य प्राप्त केले जात आहे.