पेठ : (रामदास शिंदे ) कोरोनासारखा संसर्गजन्य आजार आणि त्यामुळे सर्व जगच थबकले असताना आयुष्याचा जोडीदार शोधणाऱ्या भावी वधू-वरांच्या रेशीमगाठी कशा जुळणार, या विवंचनेत असलेल्या पालकांना दिलासा मिळाला आहे. नाशिकच्या एका संस्थेच्या वतीने प्रथमच आॅनलाइन वधू-वर सूचक मेळावा आयोजित करून याही समस्येवर उपाय शोधून काढला आहे.लग्न जमविण्यासाठी आता अनेक पद्धती अवलंबिल्या जातात. गेल्या काही वर्षात वेबसाइट, वधू-वर परिचय मेळावा, माहिती पुस्तिका या माध्यमातून अनेकांना आपला योग्य जीवनसाथी मिळाला आहे. लग्न जमविण्यासाठी अनेक संस्था आता विविध शहरात स्थापन झाल्या आहेत. या सर्व आधुनिक माध्यमातून टेक्नोसॅव्ही अॅपच्या माध्यमातून लॉकडाउनच्या काळातदेखील मराठा समाज वधू-वर परिचय मेळावा पार पडला.सध्या आपण कोरोनासारख्या गंभीर समस्येला तोंड देत आहोत. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळ्या जगाची दिशा बदलली असून, दशा झाली आहे. संपूर्ण जग या महामारीचा सामना करीत आहे. सगळ्यांनी एक वास्तव स्वीकारले आहे ते म्हणजे यापुढे आपल्या कोरोना सोबतच जगावे लागेल. दोन महिन्यांपासून आपण घरात शांत आहोत. मात्र, यापुढे जगायचं असेल, प्रगती करायची असेल, काही साध्य करायचे असेल तर शांत राहून चालणार नाही. लॉकडाउन चालू झाले तरीही मल्टिनॅशनल कंपन्यांनी आपले काम थांबविले नाही. त्यांनी मार्ग काढला आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले. कंपन्यांचा हा फंडा यशस्वीही झाला. यापुढे आपल्यालाही असाच विचार करावा लागेल. कारण वेळ कोणासाठी थांबत नसते हा नियम तर आपल्या बाबतीत अधिकच लागू होतो. कारण वधू-वरांचे वय हे न थांबणारे आहे आणि जर वय वाढत गेले तर पुढील स्थळांचे पर्याय दिवसेंदिवस कमी होत जातात. आधीच हातातले दोन महिने वाया गेले आहेत. मग आपण का थांबायचे? यासाठी काळाची पाऊले ओळखून आॅनलाइन वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला होता. घरात बसून वधू-वरांनी अॅपच्या माध्यमातून आपला परिचय करून दिला.-----------------खर्चिक लग्नपद्धतीला ब्रेककोरोनामुळे सर्वच थांबलेलं असताना अनेकांना आपली लग्न पुढे ढकलावी लागली तर काहींनी मोठ्या लग्नाला फाटा देत कुटुंबीयांच्या उपस्थितीत घरातच लग्नाला पसंती दिली. काहींनी तर आॅनलाइन वधू-वरांना पसंत करत साखरपुडादेखील आॅनलाइन केल्याच्या बातम्या आपण बघितल्या. या हायटेक लग्नपद्धतीला राजकीय मंडळीदेखील अपवाद राहिली नाही. यामुळे अनेक प्रथांंना फाटा देत खर्चाचीही बचत होत असल्याचे वधू-वर पित्यांनी समाधान व्यक्त केले आहे.--------------संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत २५०० विवाह जमले असून, लॉकडाउनमध्येदेखील साध्या विवाहांना लोक पसंती देत आहेत. आॅनलाइन मेळाव्याचा हा समाजातील पहिलाच प्रयोग होता. वधू-वरांसोबतच पालकदेखील टेक्नोसॅव्ही झाल्याचे या माध्यमातून बघायला मिळाले.- हेमंत पगार, संचालक,वधू-वर मेळावा संस्था
लॉकडाउनमध्येही जुळताय आॅनलाइन रेशीमगाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 9:39 PM