नाशिक : नाशिकला बुधवारी केवळ २६२ ॲम्फोटेरेसिन इंजेक्शन प्राप्त झाले असल्याने म्युकरमायकोसिसग्रस्त रुग्णांना केवळ एकच इंजेक्शन मिळाल्याने इंजेक्शनमध्ये वाढ होण्याऐवजी पुन्हा घसरण झाली आहे.
जिल्ह्यातील रुग्णांसाठी मंगळवारी ३९८ इंजेक्शन मिळाल्याने आज त्यापेक्षाही अधिक इंजेक्शन मिळाल्यास प्रत्येक रुग्णाला किमान दोन इंजेक्शन मिळण्याची आशा होती. मात्र, इंजेक्शन प्राप्त होण्याच्या प्रमाणात बुधवारी पुन्हा मोठी घट आल्याने रुग्णांच्या कुटुंबीयांच्या प्रयत्नांना पुन्हा धक्का बसला आहे. आठवडाभरापासून केवळ एक किंवा इंजेक्शनच नाही, अशी परिस्थिती रुग्णांवर येत असल्याने रुग्णांसह त्यांच्या कुटुंबीयांना प्रचंड चिंतेत टाकले आहे. तातडीने इंजेक्शन्सचा पुरेसा साठा न मिळाल्यास बहुतांश रुग्णांचा आजार बळावण्याची शक्यता आहे. तसेच अनेक रुग्णांवर पुन्हा दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया कराव्या लागत आहेत. त्यामुळे ताबडतोब ॲम्फोटेरेसिनचा पुरवठा करावा, यासाठी अनेक रुग्ण आणि कुटुंबीयांनी थेट आरोग्य मंत्र्यांपर्यंत त्यांचे गाऱ्हाणे मांडले आहे. राज्य शासनानेदेखील आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा काढून ॲम्फोटेरेसिनची साठ हजार इंजेक्शन्स मागवली असली तरी ती पोहोचण्यास जून महिन्याचा पहिला आठवडा उजाडणार असून तोपर्यंत रुग्णांचा आजार बळावणार असून रुग्णालयांच्या बिलांत होणाऱ्या दिवसागणिक वाढीने नागरिकांच्या समस्येत मोठीच भर पडत आहे.