तालुक्यात कृषी विभागाने यंदा ९२ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. तालुक्यात गेल्या २९ मेपासून पावसाला सुरुवात झाली. अद्यापपर्यंत पुरेसा पाऊस झाला नाही. सरासरी ७१ मि.मी. पाऊस पडला आहे. तालुक्यातील काही भागांमध्ये पेरणी सुरू झाली आहे; मात्र कृषी विभागाने पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन केले आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. जून महिना संपत आला असतानादेखील पावसाचा मागमूस नाही. येथील कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामासाठी ९२ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पीक लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. बाजरी २३ हजार ९११, ज्वारी २२० तर नगदी पीक समजले जाणाऱ्या मका पिकाची ४ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाणार आहे. तूर १ हजार, मूग ३५००, उडीद ५००, भुईमूग १२००, सोयाबीन २००, कापूस २१०० हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांना मान्यता प्राप्त कृषी सेवा केंद्रांमधून नामांकित कंपनीचे बियाणे उपलब्ध करून दिले जात आहे तर खरीप हंगामासाठी लागणाऱ्या रासायनिक खतांचे २५ हजार ८३ मेट्रिक टन नियतन नोंदविण्यात आले आहे. यात युरिया ११ हजार २२७, डीएपी २ हजार ९२२, एनओपी ६९९, एसएसपी ७ हजार ६०० मेट्रिक टन खतांचा समावेश आहे. गेल्या १५ जूनपर्यंत तालुक्यातील १३८ कृषी सेवा केंद्रांकडून ११ हजार ५२४ मेट्रिक टन खते उपलब्ध झाली आहेत. उर्वरित खते जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी दिली आहे.
-----------------------------
तालुक्यात आतापर्यंत बाजरी ८२८ हेक्टर, ज्वारी ३४ हेक्टर, मका १ हजार ६२३ हेक्टर, तूर ३६ हेक्टर, मूग ११७ हेक्टर, भुईमूग ४७ हेक्टर, कापूस ६ हजार ९०३ हेक्टर अशी ९ हजार ६१३ हेक्टरवर खरीप पिकांची लागवड झाली आहे. सरासरी ११ टक्केच पेरणी झाली आहे.