नाशिक : वाढती विकासाची भूक आणि सीमेंटची जंगले ही निसर्गाचा ºहास करणारी ठरत आहे. त्याची परिणिती नाशिककरांनादेखील येणार आहे. आगामी वीस वर्षांसाठी शहराचे नियोजन करताना शासनाने तयार केलेल्या विकास आराखड्यानुसार आता टप्प्याटप्प्याने सीमेंटची जंगले वाढणार असून, हरित क्षेत्र अवघे २० टक्के राहणार आहे. त्यामुळे निसर्ग तर उद्ध्वस्त होईलच शिवाय नाशिककरांना तपमानवाढीसारख्या अनेक भीषण परिणामांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. कोणे एकेकाळी नाशिक हे दंडाकारण्य म्हणून परिचित होते. निसर्गसंपदा हे नाशिकचे वैशिष्ट्य होते. थंड हवेचे ठिकाण म्हणूनही शहराचा लौकिक होता. नाशिकमध्ये स्थायिक होण्यासाठी त्याचबरोबर नवीन गुंतवणुकीचा आकर्षण बिंदूदेखील नाशिकचे हवापाणी हाच होता. परंतु आता हे सर्व बदलू लागले आहे. एप्रिल महिन्यातच पारा चाळिशीच्या पार गेला आणि आता तर वाढत्या रहिवास क्षेत्रामुळे वातावरणातील बदलासह अन्य अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. नाशिक महापालिकेचे क्षेत्रफळ २५९.१२ चौरस किलोमीटर आहे. म्हणजेच २६ हजार ७४७ हेक्टर इतके आहे. नाशिक महापालिकेचा पहिला विकास आराखडा १९९२ ते ९५ दरम्यान मंजूर झाला. त्यावेळी ५ हजार ८७५ हेक्टर इतके क्षेत्र रहिवासी करण्यात आले होते. म्हणजे त्यावेळची वने, औद्योगिक आणि आर्टिलरीसारखे क्षेत्र वगळून या विकसित होऊ शकणाऱ्या क्षेत्राचा विचार केला तर ते ५२.४८ टक्के इतके होते. परंतु आता दुसरा विकास आराखडा करण्यात आला, तोपर्यंत हे रहिवास क्षेत्र पूर्णत: विकसित होऊ शकले नाही व अवघे ४१.१ टक्के इतकेच क्षेत्र विकसित होऊ शकले आहे. असे असताना नव्या आराखड्यात भविष्यातील लोकसंख्येचा विचार करून मोठ्या प्रमाणात रहिवास क्षेत्र विकसित करण्यात आले आहे. नव्या आराखड्यात १५ हजार ४४ हेक्टर क्षेत्र रहिवासी क्षेत्र दर्शविण्यात आले असून, त्याची एकूण क्षेत्रफळाशी तुलना केली तर ती ७८. ७९ टक्के इतकी आहे. तर उर्वरित क्षेत्र ज्यात नदी, नाले, वने आणि क्षेत्राचा विचार केला तर ते २१.९७ टक्के हरित क्षेत्र उरणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात रहिवासी क्षेत्र वाढल्यानंतर सीमेंटचे जंगल तर वाढेल शिवाय त्याचे दुष्परिणाम म्हणून तपमानवाढीसह अनेक परिणामांना सामोरे जावे लाढणार आहे.
नाशिकमध्ये हरित क्षेत्र उरणार अवघे २० टक्के!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 1:13 AM