नाशिक : मागील दोन वर्षांत वरुणराजाची कृपा बरसलेल्या नाशिक जिल्ह्यातील धरणांनी आता तळ गाठण्यास सुरुवात केली असून जून अखेरीस जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा २७ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी या कालावधीत २९ टक्के इतका साठा शिल्लक होता.
जिल्ह्यात लहान, मोठे असे २४ धरण प्रकल्प असून ६५,६६४ दशलक्ष घनफूट संकल्पित उपयुक्त पाणीसाठा क्षमता आहे. त्यातील मोठ्या प्रकल्पाची क्षमता ४८,००४ दलघफू तर मध्यम प्रकल्पाची क्षमता १७,६६० दलघफू इतकी संकल्पित क्षमता आहे. सद्य:स्थितीत या प्रकल्पांमध्ये १७,६८५ इतका उपयुक्त पाणीसाठा असून त्याची टक्केवारी २७ इतकी आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जलसाठा केवळ दोन टक्क्यांनी कमी असला तरी जिल्ह्यात दमदार पाऊस नसल्याने चिंता वाढली आहे. मागील वर्षी १९,२४१ इतका उपयुक्त जलसाठा होता तर सद्य:स्थितीत १७,६८५ इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला असला तरी अजूनही जिल्ह्यात केवळ १३.८४ टक्के इतकाच पाऊस झाला आहे. इगतपुरी, सुरगाणा, बागलाण आणि सिन्नर या तालुक्यांव्यतिरिक्त अजूनही इतरत्र चांगला पाऊस झालेला नाही. पावसाचे क्षेत्र अशी ओळख असलेल्या त्र्यंबकेश्वरलाही अजून अपेक्षित पाऊस झालेला नाहीे.
आदिवासी डोंगरी भागात पडणाऱ्या पावसाव्यतिरिक्त जिल्हा कोरडा असल्याने शेतकऱ्यांना पिकाची चिंता लागली आहे. पावसाची ओढ कायम राहिल्यास दुबार पेरणीची धास्ती शेतकऱ्यांना वाटत आहे.
मागील हंगामात जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरली होती. त्यामुळे जिल्ह्याला पाणी टंचाई जाणवणार नाही अशी काहीशी परिस्थिती होती. परंतु जूनपासूनच धरणाने तळ गाठण्यास सुरुवात केल्याने जिल्ह्यात ५० पेक्षा अधिक टँकर्स सुरू करण्याची वेळ आली. त्यातील काही टँकर्स जूनच्या मध्यानंतर कमी झाले असले तरी आता पुन्हा टँकर्सची मागणी होण्याची शक्यता आहे.