नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २३) अवघे ४९ नवीन रुग्ण बाधित आढळले असून गतवर्षातील मे महिन्यानंतरची ही आतापर्यंतची नीचांकी बाधित संख्या आहे; मात्र अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाणदेखील दोन दिवसांपासून दोन हजारांनजीक कायम असल्याने रुग्णवाढ अल्प दिसत असली तरी तपासणीला गती मिळाल्यावरच आकडे घटलेत की तपासणीच्या संथगतीने ते कमी आले आहेत, त्याचा उलगडा होऊ शकणार आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी १०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तीन बळींपैकी दोन नाशिक ग्रामीणचे तर एक नाशिक मनपा क्षेत्रातील आहे. तर बाधित झालेल्या ४९ नागरिकांपैकी २० मनपा क्षेत्रातील,२६ नाशिक ग्रामीणचे, २ जिल्हाबाह्य तर मालेगाव मनपा क्षेत्रातील एका रुग्णाचा त्यात समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४ लाख १ हजार ७३८ वर पोहोचली असून कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची संख्या ३ लाख ९१ हजार ८८३ वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ९७.५५ टक्के आहे.
------
प्रलंबित अहवालांची संख्या १८८४
जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांची संख्या १८८४ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक ग्रामीणला १२६२, नाशिक मनपाचे ४०८ तर मालेगाव मनपा क्षेत्रातील २१४ रुग्णांचा समावेश आहे. गुरुवारीदेखील प्रलंबित अहवालसंख्या दोन हजारांनजीक असताना सलग दुसऱ्या दिवशी ती दोन हजारांच्या आसपास कायम आहे. रुग्णसंख्या कमी येत असताना प्रलंबित अहवालांची संख्या वाढण्यामागील कारण गुलदस्त्यातच आहे.