नाशिक- हल्ली बदलत्या जीवनशैलीनुसार लोकांच्या खाण्याच्या सवयीत त्यांचे प्रतिबिंब दिसून येत आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये डबा संस्कृती कमी होताना दिसत आहे. हल्ली सकस आहारापेक्षा बाहेरचं मसालेदार, चमचमीत खाण्याकडे तरूणाईचा कल वाढला आहे असे एका सर्वेक्षणात आढळून आले.
एचपीटी आर्टस अँड आरवायके सायन्स महाविद्यालयातील पत्रकरिता व जनसंज्ञापन विभागाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी तरूणाईच्या बदलत्या खाण्याच्या सवयी या विषयावर विभाग प्रमुख डॉ. वृंदा भार्गवे यांच्या नेतृत्वाखाली सर्वेक्षण केले. विशेष महाराष्ट्रीयन अन्न हे परिपूर्ण मानले जाते. शरीरासाठी आवश्यक ते सगळे पोषक घटक महाराष्ट्रीयन अन्नातून मिळतात. पण तरीही हल्ली तरूणाई महाराष्ट्रीयन अन्नापेक्षा जंकफूड, साऊथ इंडियन, चाट, इटालियन, चायनीज या पदार्थांना अधिक पसंती देतात. पोहे, उपमा, आप्पे या महाराष्ट्रीयन पदार्थांपेक्षा विद्यार्थी मॅगी, समोसा चाट, इडली या पदार्थांना नाश्ता करतेवेळी प्राधान्य देतात.दीक्षीत -दिवेकर डाएटची सगळीकडे चर्चा असली तरी केवळ ८ टक्के विद्यार्थी हे डाएट करतात. तर ८४ टक्के विद्यार्थी हे डाएट करत नाहीत. प्रत्येकावर समाजमाध्यमांवरील पोस्टचा परिणाम होत असतो. खाद्यपदार्थांविषयी पोस्ट वाचून ५२ टक्के विद्यार्थ्यांच्या खाण्याच्या सवयीत बदल होतो तर ४८ टक्के विद्यार्थ्यांंमध्ये कोणताही बदल होत नाही असे निदर्शनास आले.हल्ली आॅनलाइन फूडचा पर्यायही उपलब्ध असतो. ३० टक्के विद्यार्थी आॅनलाइन फूडचा वापर करतात. तर वेळ, स्वच्छता याचा विचार करून ३४ टक्के विद्यार्थी हा पर्याय नाकारतात. इतर ३६ टक्के विद्यार्थी गरजेनुसार या पर्यायाचा वापर करतात. ८४ टक्के विद्यार्थी बाहेर खाताना स्वच्छतेकडे लक्ष देतात. तर ७ टक्के विद्यार्थी चवीला अधिक महत्त्व देतात. उर्विरत ९ टक्के विद्यार्थी इतर घटकांबरोबर स्वच्छतेलाही महत्त्व देतात.स्वच्छतेबरोबर सकस, पोषक घटकांना ७४ टक्के विद्यार्थी महत्त्व देतात. तर निव्वळ ७ टक्के विद्यार्थी या घटकांना दुय्यय मानतात. उरलेले १९ टक्के विद्यार्थी प्रत्येक वेळी नाही पण बर्याचदा या घटकांचा विचार करतात.४८ टक्के विद्यार्थी महाविद्यालयात येण्यापूर्वी नाश्ता करून येतात तर ३४ टक्के विद्यार्थी महाविद्यालयात आल्यावर कॅन्टीन किंवा बाहेर नाश्ता करतात. उर्वरीत १८ टक्के विद्यार्थी कधी घरून तर कधी बाहेर नाश्ता करतात. उपहारगृहांमध्ये नाश्ता करताना पोहे, उपमा या महाराष्ट्रीयन पदार्थांपेक्षा मॅगी, समोसा चाट, इडली या पदार्थांना विद्यार्थी पसंती देतात. ५९ टक्के विद्यार्थी महाविद्यालयात येताना डबा घेऊन येतात तर महाविद्यालयात बसून डबा खायला पुरेशी जागा नसल्याने २४ टक्के विद्यार्थी डबा आणत नसल्याचे सांगतात. ५० टक्के विद्यार्थ्यांना बाहेरचे पदार्थ खायला अधिक आवडतात. तर केवळ ८ टक्के विद्यार्थ्यांना बाहेर खावेसे वाटतं नाही, असे म्हणणे आहे. बाहेरचे अन्नपदार्थ आवडत असले तरी ४० टक्के विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की बाहेरचे पदार्थ खाऊन पोट भरत नाही. २३ टक्के विद्यार्थी म्हणतात की पोट भरते. तर उर्विरत तरु णांच्या संमिश्र भावना आहेत.