नाशिक : कोरोनामुक्त झाल्यानंतरदेखील रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच म्युकरमायकोसिसच्या आजारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सहाही विभागात पोस्ट कोविड सेंटर्स सुरू करण्यात येणार आहेत. मात्र, ती केवळ रुग्णांना मार्गदर्शन करणारी असतील. त्यात उपचाराची कोणतीही सोय नाही.
महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी सोमवारी (दि. २४) ही माहिती दिली. पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट अधिक भयंकर होती. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. परंतु लाखो रुपये खर्च करून रुग्ण बरे झाल्यानंतरदेखील आता म्युकरमायकोसिससारख्या आजाराचा धोका वाढत आहे. नाशिकमध्ये सव्वाशेहून अधिक रुग्ण म्युकरमायकेासिसच्या आजारावर उपचार घेत आहेत. अशाच प्रकारे बरे झाल्यानंतर अनेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महापालिकेने पोस्ट कोविड सेंटर्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिक शहरातील सिडको, सातपूर, नाशिकरोड तसेच पूर्व, पश्चिम आणि पंचवटी विभागात महापालिकेच्या वतीने पोस्ट कोविड सेंटर्स सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी आयुक्तांनी वैद्यकीय विभागाला दिलेल्या आदेशानुसार पोस्ट कोविड सेंटरसाठी डॉक्टरांची निवड करण्यात आली असून, त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर ही केंद्र सुरू करण्यात येतील. याठिकाणी फोनवर मार्गदर्शन करण्याचीदेखील सोय असेल. त्यामुळे एफएक्युनुसार उत्तरे दिली जातील. ती प्रश्नावली तयार करून संबंधीत डॉक्टरांना दिली जाणार आहे. त्यानंतर डॉक्टर नागरिकांशी बोलू शकतील. अर्थात हे उपचार केंद्र नसेल येथे कोरोनामुक्त नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल केवळ मार्गदर्शन आणि संदर्भीत केले जाईल, असे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.