पंचवटी : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या विकासाबाबत बोलतात, तर दुसरीकडे गुजरातचे काय हाल चालू आहे हे सर्वांना माहीत आहे. मोदी सरकार केवळ घोषणाबाजीचे काम करत असून, सर्वसामान्य जनता, तसेच शेतकऱ्यांसाठी कोणताही हिताचा निर्णय घेत नसल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री सुबोधकांत सहाय यांनी केला आहे. सहाय यांनी बुधवारी सकाळी पुरी पीठाधिश्वर शंकराचार्य अधोक्षजानंद महाराज यांच्या आश्रमास भेट दिली, त्याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यापूर्वीच्या सरकारने सुरू केलेल्या योजना बंद झाल्या आहेत. केंद्रात व महाराष्ट्रात सध्या मोदींचे सरकार असल्याने त्यांनी राष्ट्राचा व देशाचा विचार करून सक्षम योजना राबविणे गरजेचे आहे; मात्र तसे न करता केवळ रोजच नवीन विषय बोलून जनतेची दिशाभूल करत आहे, असे सांगितले. यावेळी शंकराचार्य अधोक्षजानंद यांनी सध्याचा दुष्काळ तसेच धार्मिक व आध्यात्मिकतेच्या नावावर होणाऱ्या धर्मांतराच्या विषयावर चर्चा केली. कुटुंबासमवेत आलेल्या सहाय यांनी सकाळी रामकुंडावर स्नान करून शंकराचार्य मठात सुरू असलेल्या विश्वकल्याणार्थ होमहवन पूजनात सहभाग घेऊन विश्वकल्याणासाठी प्रार्थना केली. (वार्ताहर)
केंद्राकडून केवळ घोषणाबाजी
By admin | Published: September 16, 2015 11:34 PM