नाशिक : त्या चौघी भगिनी. भाऊ नाही. मात्र, कुटुंबात आईवडिलांनी त्यांना कधी काही कमी केलं नाही. उलट भरपूर शिक्षण दिलं. त्यामुळे मिळालेल्या ज्ञानामुळे त्या चौघींनीही पारंपरिकतेला छेद दिला आणि आपल्या आईच्या निधनानंतर अंत्ययात्रेत चौघा बहिणींनीच खांदा दिला. इत्तकेच नव्हे तर अग्निडागही या चौघींनीच केले. मुलगा नाही मग अखेरीस खांदा कोण देणार, अंत्यसंस्कार कोण करणार, अशी सतत चिंता वाहणाऱ्यांच्या आणि त्यामुळे मुलगाच हवा असा सोस बाळगणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी घटना नाशिकमध्येच घडली आहे.
उपनगर परिसरातील मंगलमूर्ती नगर येथील कोकणे कुटुंबीय तसे सुपरिचित. या मुलींचे वडील (कै.) पुरुषोत्तम कोकणे हे प्रेसमध्ये नाेकरीला होते आणि आई महापालिकेच्या शाळेत शिक्षिका. विजया, विद्या, दीपाली आणि प्रिया या त्यांच्या लाडक्या मुली. त्यांना आईवडिलांनी काहीही कमी पडू दिले नाही. उलट सर्व मुलींना चांगले शिक्षण देऊन पदवीधर केले आणि त्यांचे विवाहही करून दिले. मुलगा नाही अशी खंत बाळगण्यापेक्षा मुलींना शिक्षण देऊन मोठे करण्याच्या मातापित्यांविषयी चौघी जणीही कायम कृतज्ञताच व्यक्त करतात. २०१२ मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर आता गेल्या ४ जानेवारीला आई प्रभावती कोकणे (वय ७६) यांचेही यकृताच्या आजारामुळे निधन झाले. आईच्या आजारपणामुळे संपर्कात असलेल्या या चौघींवरही मोठा आघात झाला. परंतु त्यानंतर त्यांनी स्वत:ला सावरले. अंत्यसंस्कारासाठी मुलगा नसला तरी मुली आहेत. त्यांना आईनेदेखील शिक्षण दिले. त्यामुळे आधुनिक विचारांची कास धरत या मुलींनीच आईवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांनीदेखील त्यांना साथ दिली आणि अखेरीस त्यांनी आईला अंत्यसंस्कारासाठी नेताना खांदा दिला आणि दसक येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारदेखील केले. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे. वडिलांचे निधन झाले त्यावेळी अंत्यसंस्कार करता आले नसले तरी आता मात्र आईने केेेलेली इच्छा पूर्ण करता आली याचे समाधान वाटते, असे प्रिया यांनी सांगितले.