नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रशासकीय पातळीवर यंत्रणा कामाला लागली असून, जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष नामांकन दाखल करण्यास गुरुवार, दि. २६ एप्रिलपासून सुरू होणार असले तरी, लागोपाठच्या चार दिवसांच्या सुट्या-मुळे उमेदवारांना फक्त चार दिवसच उमेदवारी दाखल करण्यासाठी कालावधी मिळणार आहे. शुक्रवारी निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या निवडणुकीची घोेषणा करून निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. आयोगाच्या कार्यक्रमा नुसार २६ एप्रिल ते ३ मेपर्यंत म्हणजे आठ दिवस उमेदवारांना नामांकन दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. तथापि, आयोगाच्याच सूचनेनुसार शासकीय सुटीच्या दिवशी नाामांकन स्वीकारता येणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार दि. २८ व २९ एप्रिल रोजी चौथा शनिवार व रविवार असून, दि. ३० एप्रिल रोजी बुद्धपौर्णिमा व दि. १ मे रोजी महाराष्टÑ दिनाची शासकीय सुटी यापूर्वीच राज्य सरकारने जाहीर केली आहे. त्यामुळे आयोगाने नामांकनासाठी ८ दिवसांचा कालावधी दिलेला असला तरी, प्रत्यक्षात चारच दिवस नामांकन दाखल करण्यासाठी मिळणार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्णातील नाशिक व मालेगाव महापालिकेचे नगरसेवक, सर्व नगरपालिका व नगरपंचायतीचे सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य, देवळाली कॅन्टोंमेंट बोर्डाचे सदस्य, पंचायत समितीचे सभापतींना मतदानाचा हक्क असून, प्राथमिक पातळीवर जिल्ह्णात मतदारांची संख्या ६५१ इतकी आहे. या निवडणुकीत स्वीकृत सदस्यांनाही मतदानाचा हक्क बहाल करण्यात आलेला आहे. तथापि, मतदार यादी जाहीर करण्याबाबत आयोगाच्या स्वतंत्र सूचना असून, निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर तीन दिवसांनी मतदारांची प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात येईल व या यादीवर हरकती, सूचना देण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर दि. २७ एप्रिल रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार असून, सध्या प्रशासनाने प्राथमिक पातळीवर निश्चित केलेल्या मतदारांची संख्या कमी अधिक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नामांकनासाठी फक्त चार दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:48 AM