नाशिक : सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या नाशिक मर्चंट को-आॅप. बॅँकेच्या निवडणुकीसाठी अवघे चार दिवसच शिल्लक राहिल्याने तिन्ही पॅनलचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. येत्या रविवारी (दि.२३) बॅँकेची निवडणूक होत असल्याने सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच पॅनलची दमछाक होत आहे. त्यामुळे पारंपरिक प्रचाराबरोबरच सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असून आॅडिओ क्लीपचादेखील वापर केला जात आहे. नाशिक मर्चंट बॅँकेची निवडणूक यंदा निर्णायक वळणावर येऊन ठेवली आहे. वर्षानुवर्षे (कै.) हुकूमचंद बागमार यांच्या अधिपत्याखाली असलेली बॅँक आता सभासद कोणाच्या हाती सोपवणार हा उत्कंठेचा विषय ठरला आहे. बागमार यांचे सुपुत्र अजित बागमार यांनी नम्रता पॅनलवर दावा सांगितल्यानंतर अनेक वर्षे सत्तेत असलेल्या माजी संचालकांनी प्रगती पॅनल स्थापन करून प्रचार केला जात आहे. तर पारंपरिक सहकार पॅनलही विरोधात कंबर कसून उभे आहे. तिन्ही पॅनल जोमाने प्रचार करीत असून सुरुवातीला व्यापारपेठांवर लक्ष केंद्रित केले होते, परंतु आता अन्य सभासदांवरदेखील लक्ष केंद्रित करण्यात आले असून, त्यासाठी घरभेटींवर भर दिला जात आहे. सोसायट्या त्याचप्रमाणे ज्या घरात एकापेक्षा अधिक उमेदवार आहेत, अशा घरांमध्ये भेटी देऊन हमखास प्रचार केला जात आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बॅँकेतील इच्छुकांचा प्रचार सुरू असला तरी आता खरी लढाई आहे. त्यातच आता अवघे चार दिवस शिल्लक राहिल्याने ग्रामीण भागातील आप्तेष्ट आणि नातेवाइकांच्या माध्यमातून प्रचार केला जात आहे. बॅँकेचे बहुराज्यीय कार्यक्षेत्र असल्याने सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला जात असून व्हॉट्सअॅपच्या विविध ग्रुपमध्ये प्रचार करतानाच व्यक्तिगत शेअरिंग केले जात आहे. फेसबुक तसेच अन्य सोशल मीडियाचादेखील वापर केला जात आहे.लग्नसोहळे ठरले प्रचारात पर्वणीसध्या लग्नसराई सुरू झाल्याने प्रचारासाठी ते उत्तम माध्यम ठरले आहे. लग्न सोहळे तसेच अन्य कार्यक्रमांत प्रचार करण्यासाठी व्हिजीटिंग कार्ड आकाराची व्यक्तिगत प्रचार पत्रके तयार करण्यात आली असून, त्याद्वारे वेगाने प्रचार सुरू आहे. मतदार नसले तरी अशा सोहळ्यात नातवाइकांना सांगा, असे आवाहनही केले जात आहे. विशेष म्हणजे कार्यकर्त्यांबरोबरच नातेवाईकही प्रचाराला जुंपले आहे.
अवघे चार दिवस राहिल्याने ‘नामको’चा प्रचार शिगेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 11:31 PM