बागलाण तालुक्यात २०१४ मध्ये फेब्रुवारीतच गारपिटीचे संकट कोसळले होते. या संकटानेच बागलाणचे मुख्य पीक डाळिंब हद्दपार होण्यास सुरुवात झाला; मात्र त्या काळातील सरकारने कोणतेही प्रयत्न न केल्यामुळे शेतक-यांना पैसा देणारे डाळिंब पीक नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे आमदार दिलीप बोरसे यांनी निदर्शनास आणून दिले. डाळिंब पीक वाचविण्यासाठी कोणतेही संशोधन न झाल्यामुळे बागलाणचा शेतकरी कांदा, गहू, भाजीपाला या पिकांकडे वळला आहे. आधीच मेटाकुटीला आलेल्या बागलाणच्या शेतक-याचा या गारपिटीच्या संकटाने कणा मोडला आहे. त्याला उभे करण्यासाठी शासनाने तत्काळ पंचनामे करून भरीव निधी द्यावा व डाळिंब पीक वाचविण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे करण्यात आली.
इन्फो
सात वर्षांनंतर पुन्हा संकट
२०१४ मध्ये तालुक्यातील मोसम, करंजाडी खो-याला गारपिटीच्या संकटाने ग्रासले होते. आता तब्बल सात वर्षांनी पुन्हा याच भागावर हे संकट कोसळले आहे. आधीच कोरोनाच्या संकटात शेती व्यवसायला घरघर लागलेली आहे. घरात थोडीफार जमापुंजी मोडून कांदा, गहू, हरभरा, टोमेटो, मिरची पालेभाज्यांची लागवड केली. पीक जोमात आले. घरात थोडाफार पैसा येईल या अपेक्षेत असलेल्या बळीराजाचे स्वप्न गुरुवारच्या गारपिटीने भंगले.