नाशिक : आयएएस, आयपीएस, आयआरएस आणि आयएफएस पदांसाठी रविवारी (दि.५) झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला जवळपास अडीच हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेकडे पाठ फिरविली. परीक्षेला प्रविष्ट झालेल्या सुमारे ६ हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ साडेतीन हजार विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिली. शहरातील १९ केंद्रांवर झालेली परीक्षा सुरळीत पार पडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा शहरातील १९ केंद्रांवर सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांत पार पडली. या परीक्षेच्या नियोजनासाठी गेल्या महिनाभरापासून जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू होती. परीक्षेसाठी ६१९८ विद्यार्थी प्रविष्ट झाले असल्याने परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. सकाळच्या सत्रात ३६३८ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले, तर २५६० विद्यार्थी परीक्षेला सामोरेच गेले नाही. दुपारच्या दुसऱ्या सत्रातही काहीशी अशीच परिस्थिती राहिली. सकाळपेक्षा जवळपास शंभर विद्यार्थी दुसऱ्या सत्राला आलेच नाहीत. एकूण १६०१ विद्यार्थी अनुपस्थित होते.
शहरातील वाय. डी. बिटको. डी. डी. बिटको, सारडा कन्या विद्यालय, रचना विद्यालय, पेठे विद्यालय, न्यू मराठा हायस्कूल, एचपीटी महाविद्यालय, भोसला महाविद्यालय, एसएमआरके महिला महाविद्यालय आदी केंद्रांसह नाशिकरोड भागातील जयरामभाई हासस्कूल, बिटको हायस्कूल, डी. एस. कोठारी विद्यालय, र. ज. चव्हाण हायस्कूल, के. जे. मेहता हायस्कूल यांसह इंदिरानगर भागातील गुरुगोविंद सिंग स्कूल, पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंग महाविद्यालयात परीक्षा केंद्रांचे नियोजन करण्यात आले होते. जिल्हा प्रशासनातील ७५० अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परीक्षेची जबाबदारी पार पाडली. परीक्षा केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.