नाशिक : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या उपचाराकरिता रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणीसाठी प्रशासनाने दिलेला ईमेल आयडी हा फक्त रुग्णालयासाठीच आहे. त्या इमेलवरून रुग्णांच्या नातेवाईकांनी पाठवलेले जवळपास ४ हजार ई-मेल प्रशासनाला आल्याने प्रशासनाच्या डोकेदुखीत भर पडली आहे. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनसाठीच्या या ई-मेल वर सामान्य नागरिकांनी नव्हे तर केवळ रुग्णालयांनी ई-मेल करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.
या ईमेलवर नागरिकांनी मागणी करू नये. ज्यांचा रुग्ण कोविड रजिस्टर्ड रुग्णालयात दाखल असेल त्यांनी त्यांच्या रुग्णालयालाच रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याबाबतची विनंती करण्याचे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.
कोरोना रुग्णांच्या उपचारात उपयोगी पडणारे रेमडेसिविर इंजेक्शनचा संपूर्ण राज्यासह नाशिक जिल्ह्यात प्रचंड तुटवडा आहे. इंजेक्शन मिळत नसल्याने काही दिवसांपूर्वी रुग्णांच्या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलनही केले होते. या घटनेची दखल घेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांची कानउघडणी केली, तर कृषिमंत्री दादा भुसे यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन ठाण मांडले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी रेमडेसिविर इंजेक्शन हे रूग्णालयापर्यंत शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून बाजारात विक्रीसाठी न जाता कोविड रुग्णालयात दाखल रुग्णांना थेट मिळावे, यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक इमेल आयडी तयार करुन सर्व रुग्णालयांनी त्यांच्याकडे गंभीर रुग्ण आणि ज्यांना खरोखर रेमडेसिविर आवश्यक आहे, त्यांची नोंदणी करण्याचे आवाहन केले. मात्र, समाज माध्यमांवर पसरलेल्या काही संदेशांमधून ज्यांना रेमडेसिविर हवे, त्यांनी त्वरित या इमेलवर मागवावे असे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळेच संबंधित मेलवर रेमडेसिविरच्या मागण्या नोंदवल्या. त्यामुळेच अखेर जिल्हा प्रशासनाला हा मेल सामान्यांसाठी नसून केवळ रुग्णालयांसाठीच असल्याचा खुलासा करण्याची वेळ आली.