रात्रीच्या सुमारास या चालक-वाहकांना उतरवून घेण्यात आल्याने संपूर्ण रात्र नाशिकमध्ये काढण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली. ज्यांची सोय होती ते आपल्या नातेवाइकांकडे निघून गेले तर काही महामार्ग बसस्थानकावरील निवाराकक्षात मुक्कामी थांबले. चालक-वाहकांना नियमानुसार खिशात केवळ शंभर रुपये ठेवता येतात. त्यामुळे त्यांच्याकडे पैसेही जादा नव्हते. त्यांना रात्रीचे जेवण, दुसऱ्या दिवशी सकाळचा चहा, नाश्ता तसेच दुपारचे जेवण शंभर रुपयांत भागवावे लागले. त्यातून त्यांची उपासमारही झाली.
--इन्फो--
अधिकाऱ्यांचे कानावर हात
या प्रकरणी नाशिकमधील एस.टी.च्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे त्यांनी सांगितले. तर काही अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती घेऊन सांगतो, असेही उत्तर दिले.
--इन्फो--
ओव्हरटाइम टाळण्यासाठी शेड्युल्ड बदलले?
ओव्हरटाइम देण्याची वेळ येऊ नये म्हणूनच ड्युटी ब्रेक करण्यात आली असावी, असा संशय या चालक-वाहकांनी व्यक्त केला आहे. मात्र अशा प्रकारे एका जिल्ह्याची बस दुसऱ्या जिल्ह्यातील चालक-वाहक घेऊन पुढे कसे जाऊ शकतात, असा सवालही या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. बसची जबाबदारी संबंधित चालक-वाहकांची असतानाही दुसऱ्या जिल्ह्यातील कर्मचारी बस घेऊन गेल्याने सारेच गोंधळात पडले.
-- इन्फो--
दुपारी दीड वाजता मिळाली बस ताब्यात
सोमवारी रात्री नाशिकचे चालक-वाहक बस घेऊन वसई, पालघर, बोईसर, अर्नाळा या ठिकाणी गेले ते मंगळवारी दुपारी नाशिकमध्ये परतले. त्यानंतर पूर्वीच्या चालक-वाहकांच्या हाती त्यांची बस आली. त्यानंतर दुपारी दीड वाजेनंतर टप्प्याटप्प्याने त्यांनी जळगाव, भुसावळचा रस्ता धरला. या प्रकाराने कर्मचारी मात्र पुरते गोंधळून गेले आहेत.