पंचवटी : प्रभागातील पिण्याच्या पाण्याची समस्या असो की बंद पथदीप असो संबंधित विभागाच्या अधिकाºयांकडे तक्रार केल्यानंतर एकतर कर्मचारी नाही किंवा कर्मचारी पाठविले आहेत असे एकच ठरलेले उत्तर दिले जात असल्याची तक्रार लोकप्रतिनिधींनी करून अधिकाºयांच्या उडवाउडवीच्या उत्तरावर नाराजी व्यक्त केली. पंचवटी प्रभाग समितीची गेल्या आठवड्यात अधिकारी बैठकीला उपस्थित राहत नसल्याच्या कारणावरून तहकूब केलेली बैठक सोमवार (दि.२९) प्रभाग समिती सभापती प्रियंका माने यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात आली. यावेळी झालेल्या बैठकीत महापौरांच्या प्रभागात ग्रीन जिम साहित्य बसविणे या विषय पत्रिकेवरील एकाच विषयाच्या कामाला विनाचर्चा मंजुरी देण्यात आली. मनपा आरोग्य विभागाच्या वतीने केवळ ड्रीम कॅसल सोसायटीजवळ व ज्या ठिकाणी कचरा साचत नाही अशा ठिकाणी स्वच्छता करण्यात येते. कुमावतनगर, जाणता राजा कॉलनी भागात स्वच्छता नाही. मनपा सुलभ शौचालय स्वच्छ राहत नसल्याची तक्र ार कमलेश बोडके यांनी केली. प्रभाग ४ मधील लामखडे मळ्यात घंटागाडी नियमितपणे येत नसल्याने तसेच कमी दाबाने पिण्याचे पाणी येते त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली, असे प्रा. सरिता सोनवणे, शांता हिरे यांनी सांगून संबंधित विभाग दखल घेत नसल्याची तक्रार केली. प्रभाग २ मधील दत्तनगर, तुलसी कॉलनी येथे पाणी येत नसल्याने नागरिकांची गैरसोय होते असे पूनम सोनवणे यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत नंदिनी बोडके, विमल पाटील, पूनम धनगर, शीतल माळोदे, भिकूबाई बागूल, सुरेश खेताडे आदींसह विभागीय अधिकारी बी. वाय. शिंगाडे, नगररचनाचे दौलत घुगे, संजय गोसावी, वसंत ढुमसे, राहुल खांदवे, वनमाळी आदींनी सहभाग घेतला होता. लोकप्रतिनिधींनी केलेल्या घंटागाडी, पाणी, आरोग्य, विद्युत, तसेच अन्य नागरी समस्या मांडल्यास त्याची तत्काळ दखल घ्यावी, अशी सूचना माने यांनी केली.
प्रभाग बैठकीत एकच विषय मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 12:52 AM