नाशिक- चेहेडी बंधाऱ्यातील पाणी कमी झाल्यानंतर दरवर्षी प्रमाणेच यंदाही गाळ आणि जंतुयुक्ती पाणी पुरवठा सुरू होताच महापालिकेने येथील पाणी उपसा थांबवला आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून गंगापूर धरणातून पाणी घेतले जात असले तरी सुमारे सात एमएलडी इतके पाणी कमी पडत असल्याने नाशिकरोड एकच वेळ पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरीक त्रस्त झाले असून स्थायी समितीच्या बैठकीत यासंदर्भात पडसाद उमटताच दोन दिवसात पाणी पुरवठ्यासंदर्भात बैठक घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
स्थायी समितीची बैठक सोमवारी (दि.१७) सभापती गणेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी आॅनलाईन बैठकीत याविषयावर जोरदार चर्चा झाली. नाशिकरोड विभागाला चेहेडी बंधाºयातून दारणा नदीतून पाणी पुरवठा केला जातो. परंतु देवळाली कॅम्प परिसरातील मलयुक्त पाणी चेहेडीत जाते आणि दुषित जंतुयूक्त पाण्यामुळे चेहेडी पंपींग स्टेशनला शुध्दीकरणात अडचणी येतात आणि नाशिकरोड परीसरात दुषीत पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे उन्ह्याळ्यात चेहेडी बंधाºयाची पातळी कमी झाली की, दारणेऐवजी गंगापूर धरणातून नाशिकरोड विभागाला पाणी पुरवठा केला जातो. दरवर्षी दोन महिने कालावधीत ही समस्या उदभवते. यंदा अपेक्षीत पावसाळा सुरू झालेला नसल्याने अद्यापही गंगापूर धरणातूनच नाशिकरोड भागाला पाणी पुरवठा केला जात आहे. दरम्यान, सध्या एकवेळ आणि तेही दुषीत पाणी पुरवले जात असल्याने प्रा. शरद मोरे आणि राहूल दिवे यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली.
पाणी पुरवठा विभागाच्या वतीने जलसंपदा विभागाला सहा महिन्यांपूर्वीच पत्र देऊन उन्हाळ्याच्या अखेरीस आधी वालदेवीचे पाणी येऊन गेल्यानंतर दारणाचे आवर्तन सोडा अशी सूचना करण्यात आली होती. मात्र, जलसंपदा विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती यावेळी अधीक्षक अभियंता संदीप नलावडे यांनी दिली. त्याच बरोबर गंगापूर धरणातून पाणी घेताना ते सध्या अपुरे पडत असल्याने पाणी टंचाई जाणवत असल्याची कबुलीही त्यांनी दिली. सभापती गणेश गिते यांनी यासंदर्भात दोन दिवसात नगरसेवकांसमवेत बैठक घेण्याची सूचना केली.
दरम्यान, चेहेडी बंधाºयात ज्या ठिकाणी वालदेवी नदीचे पाणी येते, त्याच्या वरील बाजूने दारणा नदीत जलवाहिनी टाकून पाणी उपसा करण्याचा प्रस्ताव आहे. मनपाने पाणी पुरवठा विभागाने या जलवाहिनीसह अन्य पाणी योजनांचा एकुण २२७ कोटी रूपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. मात्र तो प्रलंबीत आहेत.