नाशिक : तीन कोटींची सौर पथदीप खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडलेली असतानाच आता नव्याने सव्वा कोटींच्या सौर पथदीपांचा पुरवठाच झालेला नसल्याची धक्कादायक बाब नव्याने उजेडात आली आहे. मुदत उलटूनही पुरवठा न करणाऱ्या संबंधित पुरवठादारावर दंडाची कारवाई करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य रवींद्र जाधव यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. देवरे यांनी ऊर्जा अधिकारी विजय उगले यांना विचारले की, ग्रामपंचायतींना करावयाच्या सौर पथदीपांचे दोन पुरवठा आदेश देण्यात आले होते काय? निफाडसह काही तालुक्यांत सौर पथदीपांऐवजी फक्त लोखंडे दांडे आणि बॅटरीचा पुरवठा करण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पंचायत समिती सदस्य अनिल पाटील यांनीही याबाबत आपल्याकडे तक्रार केल्याचे सांगितले. त्यावर तीन कोटींचा पुरवठा आदेश रद्द करण्यात आल्याचे तसेच संपूर्ण साहित्य बसविल्याशिवाय देयक अदा केले जाणार नाही, असा पवित्रा ऊर्जा अधिकारी विजय उगले यांनी घेतला. त्यावर शिवसेना गटनेते प्रवीण जाधव यांनी सौर पथदीपांचे दोन आदेश देण्यात आले होते काय? अशी विचारणा उगले यांना करताच त्यांनी एक पुरवठा आदेश तीन कोटींचा एप्रिल महिन्यात देण्यात आला होता. या आदेशानुसार मे महिन्यात ८० ग्रामपंचायतींना सौर पथदीपांचा पुरवठा करण्यात येणार होता. मात्र पुरवठादाराने अद्यापही सौर पथदीपांचा पुरवठा न केल्याने तो ठेका रद्द करून नव्याने ई-निविदा काढण्यात येणार आहे. तसेच दुसरा सव्वा कोटी रुपयांचा सौर पथदीप पुरविण्याचा ठेका एका कंपनीला दिला असून, त्यांचीही मुदत मे महिन्यातच होती. मात्र काही ठिकाणी अजूनही सौर पथदीप बसविण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. त्यावर संतप्त झालेल्या रवींद्र देवरे व प्रवीण जाधव यांनी सौर पथदीप नव्हे, तर संबंधित ग्रामपंचायतींमध्ये केवळ पथदीपाचे लोखंडी दांडे व बॅटरी बसविण्यात आले असून, एकाही ठिकाणी सौरचे पॅनल बसविण्यात आलेले नसल्याचा आरोप केला. संबंधित ठेकेदाराने वेळेत पुरवठा न केल्याबद्दल त्याच्यावर आर्थिक दंडाची कारवाई करा, असे आदेश कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर यांनी दिले.(प्रतिनिधी)कोल्हापूरची पुनरावृत्ती होऊ न देण्याचा सल्ला ४रवींद्र देवरे यांनी सभेत संबंधित पुरवठादाराला जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याने सदस्यांची पूर्तता न केल्यानेच ही वेळ आल्याची माहिती दिली. ती सदस्यांचा व पदाधिकाऱ्यांना लांच्छनास्पद असल्याचा आरोप विजय उगले यांच्यावर केला असता उगले यांनी आपण असे ठेकेदाराकडे बोललोच नाही, असा पवित्रा घेतला. त्याचाच धागा पकडून शैलेश सूर्यवंशी यांनी जिल्हा परिषदेचे दोन अधिकारी नको त्या प्रकरणात सापडले आहेत. यापुढे तरी असे घडणार नाही, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्वांना ताकीद द्यावी, असे सांगितले.४ त्यावर मिश्किलपणे प्रा. अनिल पाटील यांनी सीईओंनी नेमकी काय ताकीद द्यायची, जादा घेण्याची की कमी घेण्याची, असा टोला मारला. त्यावर अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी सीईओंच यावर उत्तमप्रकारे सांगू शकतील, असे सांगितले. त्यांच्या पात्रतेमुळे त्यांना फळे मिळाली, असे मार्मिक उत्तर मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी दिले. त्याचवेळी नाशिकला कोल्हापूरची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी तुम्हीही घ्या, असा खोचक सल्ला सदस्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
केवळ ‘खांबांचा’ पुरवठा
By admin | Published: August 04, 2015 10:58 PM