नाशिकः राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांच्यापाठोपाठ माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर अशा प्रकारचे मेसेज व्हायरल होत आहेत. या सर्व प्रकरणावर खुद्द छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत शिवसेना प्रवेशाच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. मी शिवसेनेत प्रवेश करत नाही आहे, या बातम्या सर्व खोट्या आहेत. शिवसेनेच्या प्रवेशाचं त्यांनी खंडन केलं आहे. गुजरातला महाराष्ट्रातलं जाणारं पाणी परत महाराष्ट्रात वळवणारा मांजरपाडा प्रकल्पाचं मी आज जलपूजन केलेलं आहे. त्यामुळे माझ्याबद्दल तुम्ही जे काही विचारत आहात, त्यात काहीही तथ्य नाही.सचिन अहिर याच्यासंदर्भातील वृत्तही मी टीव्हीवर ऐकलेलं आहे. माझं आणि सचिन अहिरचं काही बोलणं झालेलं नाही, असा खुलासाही छगन भुजबळांनी केला आहे. आज येवल्यात भुजबळांच्या हस्ते मांजरपाडा प्रकल्प जलपूजन करण्यात येत आहे, त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तर छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाचं वृत्त पुतणे समीर भुजबळ यांनीही फेटाळून लावलं आहे. ते म्हणाले, आम्ही आता खूप पुढे निघून आलोय. मलाही मेसेज आला. तथ्यहीन आणि हास्यास्पद असल्याचं ते म्हणाले आहेत.
शिवबंधन हाती बांधण्याची बातमी ही निव्वळ अफवा- छगन भुजबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 10:27 AM