महानगरपालिकेने सातपूर अंबड लिंक रोडवरील अनधिकृत भंगार मार्केट हटविल्यानंतर या व्यावसायिकांनी आजूबाजूच्या परिसरात पुन्हा आपले व्यवसाय सुरू केले आहेत. प्रभाग क्रमांक २६ मधील केवल पार्क भागात डेरा बसविला आहे. मोकळे भूखंड भाड्याने (काही विकत घेऊन) घेऊन तेथे गोदाम केले आहे. मोकळ्या भूखंडांवर गेल्या काही दिवसांपासून जुने भंगार, तुटलेल्या चप्पल, बुटांचे भंगार ठेवले जात आहे. याठिकाणी घाण पाणी साचून डेंग्यूचे डास, विषारी किटक, तसेच विषारी सापांचे वास्तव्य असते. त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याच परिसरात कोरोनाचे ८० रुग्ण आढळले आहेत. दोन दिवसांपूर्वी विषारी सापाच्या दंशापासून लहान मुलगा थोडक्यात बचावला. भंगार व्यावसायिकांमुळे आजूबाजूचे रहिवासी त्रस्त झाले असून, प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी महादेवनगर जनसेवक समितीचे विजय अहिरे, भारत भालेराव, संजय तायडे, नाना आव्हाड, प्रवीण भवर, सुनील गुंजाळ, आमिन शेख, विकास जगताप, भगवान पवार, दीपक पगारे, ज्ञानेश्वर आव्हाड, समीर रेड्डी, अक्षय बेंडकुळे, किशोर सोनवणे, जगदीश पगारे, कृष्णा भालेराव, दीपक काकविपुरे, अंबादास कापसे, तुकाराम घुले, शांताराम गुंजाळ, परेश पाटील, अमोल आरणे, राहुल जाधव, धम्मपाल वाहुळे, दीपक भालेराव, रितेश कांबळे, अविनाश केदारे आदींनी केली आहे.
इन्फो===
केवल पार्क भागातील भूखंड मालकांनी पैसे कमावण्यासाठी भंगार व्यावसायिकांना भूखंड भाडेतत्त्वावर दिले आहेत. भूखंडांवर भंगार साठवून नागरिकांच्या जिवाशी खेळत आहेत. घाणीचे साम्राज्य, डासांची उत्पत्ती, नेहमीच पसरणारी दुर्गंधी यामुळे आजूबाजूचे रहिवासी त्रस्त झाले आहेत. याचा भूखंड मालकांनीच विचार करणे गरजेचे आहे.