नाशिक : दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारपासून पुन्हा शहरात लस उपलब्ध होणार असली तरी ती सकाळी ११ नंतर आणि केवळ दुसरा डोस घेणाऱ्यांनाच मिळू शकणार आहे. एकूण ३५ केंद्रांवर प्रत्येकी १४० लस उपलब्ध राहणार आहेत.
शहरातील लसीकरणासाठी रविवारी सायंकाळी ६ हजार लस उपलब्ध झाल्या आहेत. त्या लसी सर्व केंद्रांवर पोहोचण्यास सकाळी काहीसा विलंब लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवारची शहरातील लसीकरणाची प्रक्रिया सकाळी ११ नंतरच सुरू होणार आहे. त्यात शहरातील ३२ केंद्रांवर कोविशिल्डचा दुसरा डोस तर केवळ इंदिरा गांधी हॉस्पिटल, समाजकल्याण आणि जेडीसी बिटको हॉस्पिटल या तीन ठिकाणी कोव्हॅक्सिनचा दुसरा डाेस उपलब्ध राहणार आहे.
इन्फो
लसीकरणातील सातत्याचा अभाव
कधी पहिलाच डोस, कधी दुसराच डोस, कधी लस उपलब्ध नाही, कधी लस आल्याच नाहीत अशा बहुविध कारणांनी लसीकरणाला विलंब लागत आहे. त्यात केंद्रावर चार-पाच तास रांगेत उभे राहूनदेखील नागरिकांना लस संपल्याचे सांगून माघारी पाठविले जाते. त्यामुळे नागरिक लसीकरणाच्या प्रक्रियेला त्रस्त झाले आहेत. मात्र, लसीचा साठाच पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने यंत्रणादेखील हतबल झाली आहे.