दाट लोकवस्ती असलेल्या सिडको परिसरात सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात राहत असून, यामुळे महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर दररोज सकाळपासूनच लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होते. परंतु गेल्या प्रशासनाच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे गेल्या तीन दिवसांपासून बंद असलेल्या लसीकरण मोहिमेला महापालिकेच्या सिडकोतील केंद्रावर बुधवारी दुपारी बारा वाजेपासून लसीकरणास सुरुवात करण्यात आली. परंतु लसीकरण हे केवळ दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांसाठी असल्याने पहिला डोस घेणाऱ्या अनेक नागरिकांना मात्र लस न घेताच माघारी फिरावे लागले .
महापालिकेच्या जुने सिडको येथील केंद्रावर सकाळी बारा वाजेपासून दुसरा डोस देण्यास सुरुवात करण्यात आली. मनपाच्या मोरवाडी येथील श्री स्वामी समर्थ हॉस्पिटलमध्ये उशिराने लस उपलब्ध झाल्याने दुपारी साडेबारा वाजता लस देण्यास सुरुवात झाली. या ठिकाणीदेखील दुसरा डोस असणाऱ्यांनाच लस देण्यात आल्याने पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांना लस न घेता परत जावे लागले. तर हेडगेवार चौक येथे मनपाच्या माध्यमातून नगरसेवक भाग्यश्री डोमसे यांनी सुरू केलेल्या केंद्रावरदेखील दुसरा डोस असणाऱ्यांनाच लस देण्यात आल्याचे चित्र बघावयास मिळाले .
कोट====
वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार आमचे कामकाज सुरू आहे. सिडको परिसरातील सर्वच नागरिकांना पहिला अथवा दुसरा डोस देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. परंतु बुधवारी केवळ दुसरा डोस असणाऱ्या नागरिकांना लस देण्यात यावी अशा गाइडलाइन्स वरिष्ठांकडून आल्याने पहिला डोस घेणाऱ्यांना लस देता आली नाही.
-प्राजक्ता कडवे, वैद्यकीय अधिकारी, मनपा सिडको