नाशिक : महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या अंतर्गत घोळ आणि गटबाजीमुळे दहा उमेदवारांचे एबी फॉर्म बाद झाल्यानंतर पक्ष त्यांना पुरस्कृत करणार आहे, त्यांना एकच चिन्ह प्रचारासाठी द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेऊन केली. तसेच प्रभाग क्रमांक २९ मध्ये दोन उमेदवार बदलल्याने त्यांना अधिकृत उमेदवार ठरविण्याची मागणीदेखील देसाई यांनी केली. मात्र संबंधित विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारीच त्याबाबत निर्णय घेतील, असे आयुक्तांनी त्यांना सांगितले. महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या अंतर्गत घोळामुळे पंचवटी विभागातील चार उमेदवारांनी त्यांचे नाव नसलेले एबी फॉर्म जोडले होते, तर प्रभाग क्रमांक ३० मध्ये चार उमेदवारांनी एबी फॉर्मच्या झेरॉक्स जोडल्या होत्या या दोन्ही प्रभागांतील आठ उमेदवारांचे एबी फॉर्म संबंधित विभागाच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी रद्द ठरविल्याने त्यांना अपक्ष नगरसेवक म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर देसाई यांनी नाशिकमध्ये कायदेशीर सल्लामसलत करून नंतर आयुक्त तथा महापालिकेचे मुख्य निवडणूक अधिकारी असलेल्या अभिषेक कृष्ण यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आठ उमेदवारांना समान प्रचार चिन्ह देण्याची मागणी केली. तसेच प्रभाग क्रमांक २९ मध्ये भूषण देवरे आणि दीपक बडगुजर आणि अॅड. अरविंद शेळके व सतीश खैरनार या चौघांना पक्षाने एबी फॉर्म देण्यात आला असला तरी देवरे आणि बडगुजर माघार घेणार असून, त्यांच्याऐवजी अॅड. शेळके व खैरनार यांना शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करावे, अशी मागणी त्यांनी केली. सिडको, नाशिक पूर्व आणि पंचवटी विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी कायदेशीर बाब तपासून निर्णय घेतील, असे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
शिवसेनेच्या पुरस्कृत अपक्षांना हवे आहे एकच चिन्ह
By admin | Published: February 07, 2017 12:44 AM