नाशिक (दिनेश पाठक) : लोकसभा निवडणुकीच्या दिंडाेरी मतदारसंघासाठी मंगळवारी (दि.३०) एकही अर्ज दाखल झाला नाही तर नाशिक मतदार संघासाठी तीन अर्ज दाखल झाले. नाशिकसाठी महायुतीचा उमेदवार अद्यापही जाहीर न झाल्याने सस्पेन्स कायम आहे.
नाशिक लोकसभा मतदार संघातून जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्या दालनात कमलाकर बाळासाहेब गायकवाड (दलित शोषित पिछडा वर्ग अधिकार दल), अंजनेरी येथील सिद्धेश्वरानंद गुरू स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती ऊर्फ विठ्ठल गणपत कापसे (अपक्ष) व जितेंद्र नरेश भाभे (अपक्ष) अशी एकूण तीन नामनिर्देशनपत्रे दाखल झाली. मंगळवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची कमी असलेली संख्या तसेच त्यात प्रमुख उमेदवारांचा समावेश नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारसारखी वर्दळ दिसून आली नाही. विविध परवानग्यांसाठी आलेले कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकाऱ्यांची मात्र वर्दळ दिसून आली.
आज सुटी; उरले दोनच दिवस
१ मे राेजी महाराष्ट्र दिनाची सुटी असल्याने अर्ज प्रक्रिया बंद असेल. गुरूवार (दि.२) व शुक्रवार (दि.३) असे दोनच दिवस अर्ज दाखल करण्यासाठी मिळणार असल्याने या दोन दिवसात अर्जांची संख्या वाढेल. त्या दृष्टीने प्रशासनाने तयारी केली आहे. अर्ज नेले पण भरले नाही असे २० हून अधिक इच्छुक उमेदवार असून त्यापैकी कितीजण उमेदवारी अर्ज दाखल करणार? याकडे लक्ष लागून आहे. महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केले असले तरी महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करणे बाकी आहे. नाशिकसाठी ते अंतीम क्षणी उमेदवार जाहीर करून (दि.२) किंवा शुक्रवारी (दि.३) शक्तिप्रदर्शन करतील, असा अंदाज आहे.