नाशिक : डिसेंबर महिन्यात मुदत संपुष्टात येणाऱ्या जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना अर्ज दाखल करण्याच्या दिवसापासून अवघे ८७३ अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, कागदपत्रांची जमवाजमव तसेच पडताळणी प्रमाणपत्राची पावती मिळविण्यासाठी उमेदवारांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे.
नाशिक जिल्ह्यातील एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या २३ तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. पहिल्या दिवशी अवघे दोन तर दुसऱ्या दिवशी ११५ असे एकूण ११७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. यंदा ऑनलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करावे लागत असल्याने त्याची प्रिंटआउट तहसील कार्यालयातील निवडणूक सेलमध्ये जमा करावी लागत आहे. तीन दिवसांच्या शासकीय सुटीनंतर सोमवारी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल होतील, अशी शक्यता होती. मात्र, सोमवारी अवघे ८७३ जणांनी आपले नामांकन दाखल केले आहे.
सोमवारी मालेगाव तालुक्यातून सर्वाधिक १३२ नामांकने प्रशासनाला प्राप्त झाली. १२० उमेदवारी अर्ज हे येवला तालुक्यातील असून, दिंडोरीतून १०७ जणांनी आपले नामांकन दाखल केले आहे. देवळा आणि त्र्यंबक तालुका वगळता इतर तालुक्यांमध्ये उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची अर्ज दाखल करण्यासाठी काही प्रमाणात गर्दी दिसून आली. अर्जासोबत जातपडताळणीचे प्रमाणपत्र किंवा प्रकरण सादर केल्याची पावती आवश्यक असल्याने प्रमाणपत्र मिळविण्यासाठीची धावपळ इच्छुकांना करावी लागली.
--इन्फो-
तालुकानिहाय दाखल अर्ज (कंसात अर्जांची संख्या)
नाशिक (३६), त्र्यंबक (०३), दिंडोरी (१०७), इगतपुरी (२७), निफाड (८६), सिन्नर (९५), येवला (१२०), मालेगाव (१३२), नांदगाव (८१), चांदवड (२६), कळवण (९७), बागलाण (५६), देवळा (०७) याप्रमाणे ८७३ इतके उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.