नाशिक : एलबीटी रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या हालचालीमुळे व्यापारी आणि उद्योजक थंड झाले असून, जून महिन्यापर्यंत एलबीटीचे विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत असताना अवघे दोन टक्के व्यावसायिकांनी विवरणपत्र भरले आहेत.महापालिका हद्दीत गेल्या वर्षी एलबीटी लागू झाला. त्यानंतर विक्रीकर विभागाकडे नोंदणी असलेल्या १६ हजार व्यावसायिकांची महापालिकेने नोंदणी करून घेतली. तथापि, सुरुवातीला केवळ दोन ते अडीच हजार व्यावसायिकच कर भरत होते. महापालिकेने मोहीम राबविल्यानंतर आतापर्यंत २९ हजार व्यावसायिकांची महापालिकेकडे नोंदणी झाली आहे. वर्षभर एलबीटी भरणे किंवा न भरणाऱ्या नोंदणीकृत व्यावसायिकांना एप्रिल ते जून या तीन महिन्यांत विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे. स्थानिकस्तरावर माल घेणाऱ्यांना एलबीटी लागू नसला तरी केवळ नोंदणीकृत म्हणून निरंक विवरणपत्र भरणे आवश्यक आहे. तथापि, राज्यस्तरावर एलबीटी रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम जाणवत आहे. पालिकेकडे विवरणपत्र दाखल करणेच कमी झाले आहे. जून महिना संपण्यास पंधरा दिवसांचा कालावधी शिल्लक असताना २९ हजारपैकी दोन हजार व्यावसायिकांनीच विवरणपत्र भरले आहेत. मोठ्या कंपन्या आणि व्यापाऱ्यांचेच नाही तर निरंक विवरणपत्र भरणाऱ्यांकडूनदेखील कोणाकडून माल खरेदी केला जातो, याविषयी माहिती मिळत असल्याने त्याची फेरतपासणी करता येते. तसेच एलबीटी भरला किंवा नाही त्याचा शोध घेण्यात येत असल्याने पालिकेला या विवरणपत्र भरणाऱ्यांमध्ये स्वारस्य आहे. (प्रतिनिधी)
दोन टक्के व्यापाऱ्यांनीच भरले विवरणपत्र
By admin | Published: June 19, 2014 12:44 AM