नाशिक : गजबजलेला कॉलेजरोड आणि त्यावरील वाहनांची गर्दी यातून बाहेर पडून चालण्याचा, प्रसंगी सायकलिंग तसेच शॉपिंगचा आनंद घेता येऊ शकतो. नाशिक सिटिझन फोरमने यासंदर्भात वेगळाच प्रयोग करण्याचा प्रस्ताव सादर केला असून, पादचारी शॉपिंग मार्ग केल्यास या भागातील वाहतूक समस्या सुटू शकते, असा विश्वास व्यक्त केला आहे. कॉलेजरोड ही आधुनिक बाजारपेठ मानली जाते. कॉलेजसह शिक्षण संस्था आणि कोचिंग क्लास त्याचबरोबर ब्रॅँडेड दुकाने, सराफ बाजार आणि खाद्यसेवा देणारी दुकाने, दोन मॉल्स, बहुपडदा चित्रपटगृहे, रुग्णालये आणि मुख्य रस्त्याला मिळणाºया अनेक लेन्स अन्य सारेच काही या मार्गावर आहे. तथापि, यामुळे या मार्गावर वाहतूकही मोठ्या प्रमाणात असते. त्यातून चालणे कठीण होते, वर अपघातही घडत असल्याने पोलिसांना कॉलेजरोडवर शिस्त पालनासाठी मोठी कसरत करावी लागते. त्या पार्श्वभूमीवर मध्यंतरी महापालिकेने दुभाजक टाकून रस्त्याची वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला असला तरी हा उद्देश फार सफल झाला नाही. काही वर्षांपूर्वी पोलिसांनी त्यावर उपाय म्हणून कॉलेजरोड वन वे करण्याचा प्रयोग राबविला होता. मात्र दुकानदार आणि नागरिक या दोहांनाही हा प्रयोग रूचत नव्हता मात्र आता विदेशातील काही मार्ग त्याचप्रमाणे महाराष्टÑातही महाबळेश्वरसारख्या ठिकाणी शॉपिंग करण्यासाठी केवळ जागा ठेवून वाहनांना मनाई करता येते, त्याच धर्तीवर नाशिक सिटिझन फोरमने पोलीस आयुक्तांडे प्रस्ताव सादर केला आहे. कॅनडा कॉर्नर ते कृषिनगर चौकापर्यंतच्या टप्प्याचा विचार करून हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. अनेक नवे पर्यायही उपलब्धकॅनडा कॉर्नरकडून एचपीटी कॉलेज (कृषिनगर चौक)पर्यंत जाणारा रस्ता हा बीग बाजारच्या बाजूने पादचारी आणि सायकलस्वार यांच्यासाठीच राखीव ठेवता येईल आणि त्यासमोरील म्हणजे मॅक्डोनल्ड््सकडील लेन ही वाहनांसाठी एकेरी मार्गी करता येईल. हा रस्ता आणि कॉलेजरोड परस्पर विरोधी दिशांनी एकमार्गी असावेत, असे सुचविण्यात आले आहे. हे रस्ते परस्परांना पाटील लेनच्या माध्यमातून अनेक ठिकाणी जोडले असल्याने कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, असा फोरमचा दावा आहे. प्रायोगिक तत्त्वावर किमान सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा प्रयोग राबविला तर त्यातून व्यवहार्यता पडताळता येईल आणि समस्या सुटताना अनेक नवे पर्यायही उपलब्ध होऊ शकतील, असे फोरमचे अध्यक्ष सुनील भायभंग यांनी सांगितले.पादचारी आणि सायकलींसाठी स्वतंत्र मार्ग तसेच काही मार्ग केवळ शॉपिंगसाठीच म्हणजे ठराविक काळात वाहनांना प्रवेश बंदची कल्पना विदेशात नव्हे, तर भारतातही रुजते आहे. या प्रकारामुळे बाजारपेठेवर कोणत्याही प्रकारचा प्रतिकूल परिणाम होत नाही उलट व्यापारपेठेला चालना मिळते. कॉलेजरोडच्या पाटील कॉलनी लेनमध्ये अनेक समांतर मार्ग असल्याने एकेरी मार्ग झाल्याने कॉलेजरोडवरून जाणाºया वाहनचालकांना फार अडचण होईल असे वाटत नाही. शिवाय पार्किंगसाठी अनेक समांतर मार्ग असून, तेथे सम-विषम तारखांना पार्किंग करता येईल. शॉपिंग स्ट्रीटवर बसण्यासाठी बाक तसेच अन्य उपक्रम राबवून हा खºया अर्थाने हॅपी स्ट्रिट करता येऊ शकेल. - सुनील भायभंग, अध्यक्ष, नाशिक सिटिझन फोरम
कॉलेजरोडला होणार एकेरी मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 12:02 AM