नांदूरशिंगोटे : ढगाळ हवामान व बेमोसमी पाऊस यामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अचानक पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शुक्रवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतात पाणी साचले होते.
सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत, तर लाल कांदे काढणीस आले आहेत. परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने बळीराजा धास्तावला आहे. दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. गतवर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांना फटका बसला होता. लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पावसामुळे अस्मानी संकटाला सामोरे जावे लागत आहे. ढगाळ हवामानामुळे औषध फवारणी होत असताना, पावसाने चिंता वाढविली आहे. गतवर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस होऊनही शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन काढता आले नाही. दरवर्षी बळीराजाला आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याने त्यांचे नियोजन बिघडत आहे. शेतीमालाला भाव नाही, अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण अशा परिस्थितीत शेतकरी जीवन जगत असताना, दुसरीकडे घरगुती वापरांच्या वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत, तसेच काही भागात अद्याप उन्हाळ कांदा लागवड सुरू असल्याने, त्यावरही परिणाम झाला.