कळवण : खरेदी केलेल्या शेतजमिनीचे सातबारा उताऱ्यावर नाव लावून नोंद टाकण्यासाठी शेतकऱ्याकडून २५ हजाराची लाच स्वीकारणाऱ्या ओतूरच्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
एसीबीच्या नाशिक युनिटने कळवण येथे कारवाई केली आहे. तलाठी जयवंत कांबळे याच्याविरोधात कळवण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, १८ ऑगस्ट २०२१ रोजी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली होती. खरेदी केलेल्या शेतजमिनीचे सातबारा उताऱ्यावर नाव लावून नोंद टाकण्यासाठी ओतूर येथील तलाठी जयवंत कांबळे याने ३० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती २५ हजार रुपयाची लाच मागणी पंचासमक्ष केली. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिकचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ, पोलीस नाईक नितीन कराड, पोलीस नाईक प्रभाकर गवळी, पोलीस नाईक प्रवीण महाजन व पोलीस नाईक शरद हेंबाडे यांनी ही कारवाई केली.