ओझर : येथील विमानतळ परिसरात एचएएलच्या मालकीच्या जागेत असलेल्या मोकळ्या गायरानातील गवताला शुक्रवारी (दि.६) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आग लागली. त्यामुळे एचएएल प्रशासनाह एअरफोर्स अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. आग विझविण्यासाठी नाशिकसह पिंपळगाव, येवला येथून अग्निशमन दलाचे बंब मागविण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, ओझर विमानतळ परिसरातील चिंधादेवी गेटजवळील जुने फ्लाइट हँगरपासून ते सहा नंबर रडारपर्यंत सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास मोकळ्या गायरानातील गवताला मोठी आग लागली. वाऱ्याच्या झोतामुळे आग वेगाने पसरत गेली. त्यामुळे एअरफाेर्ससह एचएएल प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. आग विझविण्यासाठी एचएएलसह नाशिक महापालिका, पिंपळगाव बसवंत, येवला नगरपालिका, तसेच एअरफोर्सच्या अग्निशमन दलाचे बंबांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत, रात्री ८ वाजेपर्यंत सुमारे ८० टक्के आगीवर नियंत्रण आणण्यात यश मिळविले होते. सदर आग एचएएलच्या मोकळ्या गायरानातील गवताला लागली होती, परंतु त्यामुळे विमानतळाच्या धावपट्टीला कोणतीही झळ पोहोचली नसल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही, परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असलेल्या या परिसरात लागलेल्या आगीमुळे एचएएल प्रशासनासह एअरफाेर्सने चिंता व्यक्त केली असून, त्याची चाैकशी होण्याची शक्यता आहे.
इन्फो
अधिकारी ठाण मांडून
अगोदर विमानतळाला आग लागल्याची अफवा वेगाने पसरल्याने चर्चेला उधाण आले होते, परंतु सदर आग मोकळ्या गायरानातील गवताला लागल्याचे स्पष्ट झाले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. रात्री उशिरापर्यंत एचएएल व एअरफोर्सचे अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून होते. ओझर पोलीसही तातडीने घटनास्थळी पोहोचले.