नाशिक : महापालिकेची आगामी निवडणूक सन २०११ च्या जनगणनेनुसार घेण्यात येत असली चार सदस्यांच्या प्रभागांमुळे खुल्या संवर्गातील सर्वसाधारण जागांमध्ये चारने घट झाली आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत अनुसूचित जाती संवर्गाच्या तीन तर अनुसूचित जमातीच्या संख्येत एकने वाढ झाली आहे. सन २०१२ मध्ये महापालिकेची निवडणूक २०११ च्या जनगणनेनुसारच घेण्यात आली होती. त्यावेळी २६ आॅगस्ट २०११ रोजी प्रभागांच्या आरक्षणांची सोडत काढण्यात आली होती. त्यात अनुसूचित जातीसाठी १५ जागा होत्या. त्यातील ८ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या होत्या. यंदा अनुसूचित जातीसाठी १८ जागा असून, गत निवडणुकीच्या तुलनेत त्यात तीनने वाढ झाली आहे. त्यात अनुसूचित जाती महिलांसाठी एक जागा वाढली आहे. मागील निवडणुकीत अनुसूचित जमातीसाठी ८ जागा होत्या. त्यातील चार जागा महिलांसाठी आरक्षित होत्या. यंदा अनुसूचित जमातीसाठी ९ जागा असून, त्यातील पाच जागा महिलांसाठी आरक्षित होणार आहेत. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी गत निवडणुकीप्रमाणेच ३३ जागा आहेत. मात्र, नव्याने करण्यात आलेल्या चार सदस्यीय प्रभाग रचनेचा सर्वाधिक फटका खुल्या संवर्गातील सर्वसाधारण जागांना बसला आहे. सर्वसाधारण गटात मागील निवडणुकीसाठी ६६ जागा होत्या. यंदा त्या ६२ वर आल्या असून, त्यात चारने घट झाली आहे. मागील निवडणुकीत सर्वसाधारण गटातील ३२ जागा महिलांसाठी होत्या. यंदा त्यांची संख्या ३० वर आली आहे. (प्रतिनिधी)
खुल्या संवर्गातील जागा घटल्या
By admin | Published: October 07, 2016 1:27 AM