नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून बी. ए. तृतीय वर्ष राज्यशास्त्रच्या परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतीला समर्थ रामदासांनी केलेले योगदान सांगा व मनुस्मृती या ग्रंथाचे सामाजिक महत्त्व स्पष्ट करा यासारखे प्रश्न विचारून नवीन वादाला तोंड फोडले आहे. विद्यापीठाने या प्रश्नांमधून संविधान विरोधी मनुस्मृतीचा उदात्तीकरण, तसेच छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन (एआयएसफ) या विद्यार्थी संघटनेने केला आहे. या प्रश्नांविषयी एआयएसफ कडून विद्यापीठाविरोधात निषेध व्यक्त करतानाच गुरुवारी राज्यभरात यासंबंधित प्रश्नपत्रिकांची होळी करण्याचा इशाराही दिला आहे.
मुक्त विद्यापीठ पदवी परीक्षेत मंगळवारी (दि. १२) राज्यशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्र. २ (अ) न प्रश्न क्र. ३ (ई) या प्रश्नांवर एआयएसएफने आक्षेप नोंदविला आहे. मुक्त विद्यापीठात भारतीय संविधान विरोधी अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आल्याचा आरोप संघटनेचे राज्याध्यक्ष विराज देवांग यांनी केला असून, यासंदर्भात विद्यापीठाचे विद्यार्थी सेवा विभागाचे प्रभारी संचालक डॉ. प्रकाश देशमुख यांना निवेदन देत राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांची भेटच झाली नसल्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १६ जुलै २०१८ दिलेल्या निकालाचा दाखलाही या निवेदनातून देण्यात आला असून, विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात मनुस्मृती संदर्भात केलेले विवेचन घटनाविरोधी असल्याचे नमूद करतानाच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीचा इतिहास सांगून बदनामी केली जात असल्याचा आरोपही एआयएसएफने केला आहे. यावेळी एआयएसएफचे राज्याध्यक्ष देवांग, शहराध्यक्ष जयंत विषयपुष्प, शहरसचिव प्राजक्ता कापडने, कैवल्य चंद्रात्रे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
--
विद्यापीठाने जाहीर माफी मागावी
विद्यापीठाने मनुस्मृती, तसेच शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास लिहिणारी अभ्यासक्रम समिती रद्द करावी व अभ्यासक्रमातील इतिहासद्रोही, तसेच घटनाविरोधी लिखाण तत्काळ मागे घेऊन, प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांबाबत यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठाने जाहीर माफी मागावी, अशी मागणी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनतर्फे करण्यात आली आहे.
---
प्रश्नपत्रिका सेट करणाऱ्यास कोणता प्रश्न काढला ते माहीत असते. इतर कोणाला त्याची माहिती नसते. त्यामुळे झालेल्या प्रकारात पेपर सेट करणाऱ्या प्राध्यापकांना विचारणा करून विद्यापीठ योग्य कारवाई करील, मूल्यांकन विभाग यापुढे अशी चूक होणार नाही, याची खबरदारी घेईल .- डॉ. सज्जन थूल, मूल्यांकन विभागप्रमुख