नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची हिवाळी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने मंगळवारपासून (दि. ८) सुरू झाली असून, ८ ते २५ फेब्रुवारीदरम्यान या परीक्षेसाठी एकूण ७८ हजार २१७ विद्यार्थी प्रविष्ठ होणार असल्याची माहिती परीक्षा विभागातर्फे देण्यात आली.
मुक्त विद्यापीठ हिवाळी सत्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी सकाळी ८ ते १ या वेळेत एकूण विषय ३२ अभ्यासक्रमांसाठी १ हजार २२ विद्यार्थ्यांनी प्रविष्ठ होते. त्यापैकी ७३.५९ टक्के म्हणजेच ७२७ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा दिली. तर दुपारी ३ ते ८ या वेळेत १८ अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ ४५८ पैकी ५४.२९ टक्के म्हणजे २४६ विद्यार्थ्यांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाइन परीक्षा देण्यास सुरुवात केली होती. दुपारच्या सत्राची वेळ रात्री आठ वाजेपर्यंत असून, यावेळी सुमारे ३५० विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा देण्याची अपेक्षा परीक्षा विभागाने व्यक्त केली आहे. मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून हिवाळी सत्र परीक्षेसाठी दि. ३ फेब्रुवारीपासून मॉक टेस्टसह परीक्षेसंदर्भातील सूचना विद्यापीठ पोर्टलवर विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध करून कार्यवाही सुरू करण्यात आलेली असून, गुरुवारपर्यंत (दि. १०) विद्यार्थ्यांना मॉक टेस्टच्या माध्यमातून ऑनलाइन परीक्षेचा सराव करता येणार आहे. विद्यापीठाच्या आठ विभागीय केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रत्येकी ४ तांत्रिक सहायकांची नियुक्ती करण्यात आली आहे.