लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : गेल्या आर्थिक वर्षापासून रखडलेल्या जिल्ह्यातील सुमारे पाच हजार शाळांमधील ५६ मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग अखेर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने मोकळा केला असून, या सर्व विद्यार्थ्यांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या बॅँक खात्यावर थेट पैसे वर्ग करण्याची कार्यवाही जवळपास पुर्ण झाल्याने येत्या आठवडाभरात सुमारे पाच कोटी रूपये त्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी रविंद्र परदेशी यांनी दिली आहे.
दरवर्षी साधारणत: शैक्षणिक वर्ष सुरू होवून वर्षे उलट असताना मागास विद्यार्थ्यांना त्यांना हक्काच्या शिष्यवृत्तीची रक्कम मिळत असे. यात काही प्रमाणात शासनाचेही वेळोवेळी बदललेली धोरणे कारणीभूत असून, कधी कधी शाळांना विद्यार्थ्यांची माहिती आॅनलाईन भरण्याची केली जाणारी सक्ती व त्यात तांत्रिक दोष निर्माण झाल्यावर पुन्हा आॅफलाईन प्रस्ताव मागविण्यासाठी केला जाणारा वेळकाढूपणा देखील त्यास कारणीभूत असला तरी, गेल्या काही वर्षापासून जिल्हा परिषदेत पुर्ण समाजकल्याण अधिकाऱ्याचा असलेला अभाव देखील मारक ठरला आहे. यंदा मात्र प्रभारी पदभार असलेल्या परदेशी यांनी गेल्या काही महिन्यांपासून या कामी लक्ष घालून जिल्ह्यातील ४९८० शाळांमधील इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय, भटके विमुक्त जाती, जमातीतील विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्याच्या सुचना शाळांना देवून माहिती मागविली. राज्य व केंद्र सरकारकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांची परिक्षा शुल्क अशा अनेक माध्यमातून दरवर्षी सहाशे ते एक हजार रूपयांपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला शासनाकडून दिले जातात. यंदा मात्र शैक्षणिक वर्षे सुरू होताच म्हणजे जून महिन्यातच विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील अशा प्रकारचे नियोजन व कार्यवाही पुर्ण होत आली असून, शासनाकडून समाजकल्याण विभागाला आत्तापर्यत ४ कोटी ४९ लाख रूपयांचा निधीही प्राप्त झाला आहे व त्याचे लाभार्थी असलेल्या ५६ हजार ४५९ विद्यार्थ्यांची माहितीही अद्यावत करण्यात आली आहे. दोन दिवसांपुर्वी समाजकल्याण समितीने याचा आढावा घेतला. आता येत्या आठवडाभरात त्या त्या शाळांच्या व विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्यावरच सदरचे पैसे जमा करण्यात येणार असल्याचे समाजकल्याण अधिकारी रविंद्र परदेशी यांनी सांगितले.