नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेने तयार केलेल्या अॅपमधील सेवा आणखी वाढवून त्या ५५ करण्यात आल्या असून, या अॅपमधील सुधारित सेवांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर विद्युत शवदाहिनीचा लोकार्पण सोहळाही फडणवीस यांच्या हस्ते पार पडला.नाशिक जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि.५) विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेतली. यावेळी महापालिकेच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. स्मार्ट सिटीचा आढावा घेतानाच महापालिकेने विविध योजनादेखील मांडल्या. स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती देतानाच ई-कनेक्ट अॅपमधील आॅनलाइन ५५ परवानग्यांचे लोकार्पण करण्यात आले. या अॅपमध्ये महापालिकेच्या वतीने पहिल्या टप्प्यात ४५ सेवा देण्यात आल्या होत्या. त्यात काही जुन्या सेवांचादेखील समावेश होता. त्यात आता भर घालण्यात आली असून, परवानगी आणि दाखले यासंदर्भातील ५५ प्रकारच्या सेवा आॅनलाइन करण्यात आल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. एनएमसी ई-कनेक्ट अॅपमध्ये या सेवा उपलब्ध आहेत. दरम्यान, नाशिक अमरधाममध्ये साकारण्यात आलेल्या विद्युत दाहिनीचे लोकार्पणदेखील फडणवीस यांच्या हस्ते त्याच ठिकाणाहून करण्यात आले आहे. महापालिकेच्या वतीने या ठिकाणी डिझेल शवदाहिनीची सोय करण्यात आली होती. मात्र या सेवेची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे आता नाशिक अमरधाममध्ये एक विद्युत शवदाहिनी सुरू करण्यात आली असून, आणखी एका ठिकाणी सोय केली जाणार आहे.स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत शहरात शेअर सायकलिंगचे उद्घाटन करण्यात येणार होते; मात्र काही कारणांमुळे ते होऊ शकलेले नाही. आता लवकरच या उपक्रमाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. दिवाळीपर्यंत एक हजार सायकली शहरात उपलब्ध होणार आहेत. सध्या या सायकली मुंबई नाका येथे ठेवण्यात आल्या आहेत.तासाला पाच रुपये, अर्धा तास मोफतशेअर सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रोत्साहन देण्यात येणार असून, पहिल्या एक तासासाठी अवघे पाच रुपये दर असणार आहे. तर अर्ध्या तासासाठी मोफत सेवा देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.आणखी दोन उद्यानांचा विकास होणारकेंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत नाशिक महापालिकेला ४१६ कोटी रुपये देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. त्या अंतर्गत शहरातील शिवाजी उद्यान आणि कालिका उद्यानाचा विकास करण्यासाठीदेखील केंद्र सरकार निधी देणार आहे.
विद्युत दाहिनीचे फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 1:25 AM