इगतपुरीत विरोधकांची खेळी यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 01:35 AM2019-10-25T01:35:04+5:302019-10-25T01:35:59+5:30
Maharashtra Assembly Election 2019इगतपुरी मतदारसंघात कॉँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या आमदार निर्मला गावित यांचा राष्टÑवादीतून कॉँग्रेसमध्ये जात उमेदवारी मिळविणाºया हिरामण खोसकर यांनी पराभव केला आहे.
नाशिक : इगतपुरी मतदारसंघात कॉँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या आमदार निर्मला गावित यांचा राष्टवादीतून कॉँग्रेसमध्ये जात उमेदवारी मिळविणाºया हिरामण खोसकर यांनी पराभव केला आहे. मतदारसंघात दोन टर्म कॉँग्रेसकडून प्रतिनिधित्व करणाºया निर्मला गावित यांना सुरुवातीपासूनच असलेला विरोध नंतर पक्षांतरामुळे आणखीणच तीव्र झाला आणि शिवसेना-भाजपमधील इच्छुकांसह विरोधकांनी खेळी करत त्यांच्याच भाषेत बाहेरचे पार्सल परत पाठविले गेले.
निर्मला गावित यांनी राज्यातील बदलत्या राजकारणाची हवा लक्षात घेत कॉँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देत हाती शिवबंधन बांधले आणि तेथूनच गावित यांच्याबद्दल विरोधाची धार अधिक तीव्र बनत गेली. शिवसेनेत गेल्या दोन-तीन वर्षांपासून तयारी करत असलेले माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, भाजपकडून माजी आमदार शिवराम झोले या इच्छुकांची गावितांनी कोंडी केली आणि युतीतील इच्छुकांसह कार्यकर्त्यांमधील असंतोष उफाळून आला. त्यातूनच मेंगाळ, झोले यांच्यासह सेनेचे माजी आमदार पांडुरंग गांगड तसेच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे आजी-माजी पदाधिकारी गावित विरोधात एकवटले. गावित यांना सेनेने उमेदवारी देऊ नये यासाठी मातोश्रीवरही पायधूळ झाडली गेली परंतु, मातोश्रीने दाद दिली नाही. त्यामुळे असंतोषात भर पडली. तरीही दोन्ही माजी आमदारांनी गावितांच्या व्यासपीठावर एकत्र येत आपण सोबत असल्याचे जाहीरपणे दर्शविले. मात्र, अंतर्गत सुप्त विरोधाचा फॅक्टर प्रभावशाली ठरला आणि गावित यांना तिसऱ्यांदा विधानसभेत जाण्यापासून रोेखण्यात विरोधकांची खेळी यशस्वी ठरल्याचे दिसून आले.
विजयाचा मार्ग सुकर
विरोधकांमध्ये राष्टÑवादीचे हिरामण खोसकरही होते. इगतपुरीची जागा ही कॉँग्रेसकडे असल्याने खोसकर यांनी राष्टÑवादीतून कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवत विजयाचाही मार्ग सुकर केला.