नाशिक : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (बारावी) च्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी यशाचा व उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता व श्रेणी सुधारण्याची संधी असलेल्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून त्यानुसार १७ ते ३० जुलै दरम्यान दहावी व १७ जुलै तर ३ आॅगस्ट दरम्यान बारावी आणि १७ ते ३१ जुलै दरम्यान बारावीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना शुक्रवार (दि. १४) पासून २४ जूनपर्यंत मंडळाच्या संकेतस्थळावर आॅनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या मुदतीनंतर २५ ते २७ जून दरम्यान विलंब शुल्क भरून अर्ज करता येईल. विद्यार्थ्यांनी माध्यमिक शाळांमार्फत अर्ज भरण्याचे आवाहन परिक्षा विभागाने केले आहे.
महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेबु्रवारी आणि मार्च महिन्यात दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आल्यानंतर या दोन्ही परिक्षांचा निकाल जाहीर झाले आहे. यातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मंडळातर्फे पुरवणी परीक्षा घेण्यात येणार असून या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले. आहे. त्यानुसार दोन्ही वर्गांच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा ९ ते १६ जुलै दरम्यान घेण्यात येणार असून शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबार, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. यापूर्वी २१ फेबु्रवारी ते २० मार्च दरम्यान बारावीची नियमित लेखी परीक्षा पार पडली होती. नाशिक विभागातून १ लाख ५९ हजार ८९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यातील १ लाख ३५ हजार ५५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हे प्रमाण ८४.७७ टक्के इतके आहे. तसेच १ ते २२ मार्च २०१९ दरम्यान पार पडलेल्या दहावीच्या परीक्षेस विभागातून १ लाख ८९ हजार ७५० विद्यार्थी बसले होते. यातील १ लाख ५४ हजार १९३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ७७.५८ टक्के निकाल लागला होता. या दोन्ही परिक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसह श्रेणी सुधार करू इच्छिणाºया विद्यार्थ्यांनाही पुरवणी परिक्षेला बसता येणार आहे.
अनुत्तीर्णांना संधी नाशिक विभागातून १ लाख ५९ हजार ८९७ विद्यार्थ्यांनी बारावीची परिक्षा दिली होती. त्यातील १ लाख ३५ हजार ५५० विद्यार्थी उत्तीर्ण तर २४ हजार ३०९ विद्यार्थी अनुतीर्ण झाले होते. दहावीच्या १ लाख ८९ हजार ७५० पैकी १ लाख ५४ हजार १९३ विद्यार्थी उत्तीर्ण तर ३५ हजार ५५७ विद्यार्थी अनुतीर्ण झाले होते. दोन्ही मिळून ५९ हजार ८६६ विद्यार्थी अनुतीर्ण झाले असून त्यांना पुरवणी परीक्षा देण्याची संधी आहे. याशिवाय उत्तीर्ण झालेले मात्र श्रेणी सुधार करून इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही परीक्षेला प्रविष्ठ होता येणार आहे.