नाशिकरोड : अनुकंपा तत्त्वावरील मयत कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्यासाठी असलेल्या काही जाचक अटी मजदूर संघाने प्रयत्न करून शिथिल केल्या असून, वारसांनी शिक्षणात कमी पडू नये, असे आवाहन मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी केले. भारत प्रतिभूती मुद्रणालय मजदूर संघ कार्यालय आवारात मंगळवारी दुपारी मयत कामगारांचे वारस व नातेवाइकांच्या आयोजित बैठकीत बोलताना गोडसे म्हणाले की, अनुकंपा तत्त्वावरील वारसांना नोकरीत सामावून घेण्याची भरतीच्या पाच टक्के राखीवची अट शिथिल करून मजदूर संघाने पाच टक्क्यांची अट व्हॅकेन्सीवर केली आहे. तसेच आयटीआय उत्तीर्णची अट शिथिल करून वारसाला कामावर रुजू करून घेतल्यानंतर आयटीआय प्रशिक्षण घेण्याची सवलत मिळवली. तसेच ज्या मुद्रणालयात वारसाचे वडील होते त्याच मुद्रणालयात वारसाला घेण्याचेदेखील मुद्रणालय महामंडळाने मान्य केल्याचे गोडसे यांनी सांगितले.मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी आगामी वर्ष-दोन वर्षांत दोन्ही मुद्रणालयांतून मोठ्या प्रमाणात कामगार सेवानिवृत्त होणार असल्याने अनुकंपा तत्त्वावरील वारसांना जास्तीत जास्त प्रमाणात नोकरीची संधी मिळणार असल्याचे जुंद्रे यांनी स्पष्ट केले. यावेळी व्यासपीठावर सुनील अहिरे, राजेश टाकेकर, उत्तम रकिबे, इरफान शेख, उल्हास भालेराव, शिवाजी कदम, रमेश खुळे, कार्तिक डांगे, जयराम कोठुळे आदी कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीला अनुकंपा तत्त्वावरील वारस व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
अनुकंपा वारसांना मुद्रणालयात संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 11:23 PM