नाशिक : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावी परीक्षा फेब्रुवारी- मार्च २०२० श्रेणीसुधार परीक्षेची
गुणपत्रिका मिळविण्यासाठी पर्याय सादर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ३० एप्रिलपर्यंत संधी दिली आहे.
कोरोना संकटामुळे गेल्यावर्षी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर श्रेणी सुधार योजनेंतर्गत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेचा विकल्प सादर करून सुधारित गुणपत्रिकेची मागणी केल्यास सुधारित गुणपत्रिका बदलून देण्याचा कालावधी एक महिन्याऐवजी सहा महिन्यांपर्यंत वाढविण्यात आलेला होता. मात्र, राज्यातील कोविड-१९ विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी- मार्च २०२० उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेस श्रेणीसुधार योजनेंतर्गत प्रविष्ट झालेले विद्यार्थी काही अपरिहार्य कारणास्तव सहा महिन्यांच्या कालावधीत पर्याय सादर करू शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी केवळ २०२०-२१ या वर्षासाठी विशेष सवलत म्हणून पर्याय सादर करण्यास दि.३० एप्रिल २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेसाठी श्रेणीसुधार योजनेंतर्गत प्रविष्ट झालेले विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक/ प्राचार्य, सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांशी व विभागीय मंडळांशी संपर्क साधून ३० एप्रिलपर्यंत योग्य तो पर्याय निवडून यासंबंधीचा प्रस्ताव विभगीय मंडळाला सादर करण्याच्या सूचना राज्य मंडळाकडून करण्यात आल्या आहेत.