नाशिक : महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट आल्यानंतर गेल्या २० वर्षांत स्वीकृत सदस्यपदी केवळ पुरुषांनाच संधी मिळत आलेली आहे. मात्र, आता स्वीकृत सदस्यत्वासाठी महिलांनाही संधी देण्याचा विचार सेना-भाजपात सुरू असून, त्यासाठी काही महिला कार्यकर्त्यांनी वरिष्ठ स्तरावर लॉबिंग सुरू केल्याची चर्चा आहे. भूतपूर्व नगरपालिकेचे १९८२ मध्ये महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर पहिली दहा वर्षे प्रशासकीय राजवट राहिली. त्यानंतर १९९२ मध्ये पहिल्यांदा पंचवार्षिक निवडणूक घेण्यात येऊन लोकप्रतिनिधींची राजवट आली. १९९७ मध्ये दुसऱ्या पंचवार्षिक काळापासून पक्षीय बलाबलानुसार स्वीकृत सदस्य नियुक्तीची प्रक्रिया सुरु झाली. आतापर्यंत स्वीकृत सदस्यपदी गुरुमित बग्गा, संजीव तुपसाखरे, बिलाल खतीब, वामनराव लोखंडे, किशोरभाई सचदे, दामोदर मानकर, दादाजी अहिरे, शिवदास डागा, राजकुमार सूर्यवंशी, शैलेश कुटे, अनिल चौगुले, सचिन महाजन, माणिकराव सोनवणे, हरिभाऊ लोणारी, आकाश छाजेड यांची वर्णी लागलेली आहे. मात्र, स्वीकृत सदस्यपदी एकाही महिलेला संधी मिळालेली नाही. आता महापालिकेत भाजपाचे ६६, तर शिवसेनेचे ३५ सदस्य निवडून आले आहेत. पक्षीय बलाबलानुसार, भाजपाचे तीन, तर शिवसेनेचे दोन सदस्य नियुक्त होऊ शकतील. त्यामुळे आता दोन्ही पक्षांमध्ये इच्छुकांकडून स्वीकृत सदस्यपदी वर्णी लागावी याकरिता हालचाली सुरू झाल्या आहेत. परंतु, स्वीकृत सदस्यत्वासाठी महिलांनाही संधी मिळावी यासाठी काही इच्छुक महिलांनी आता वरिष्ठ स्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत. पक्षाच्या अनेक आंदोलनांसह विविध उपक्रमांत हिरिरीने सहभाग नोंदविणाऱ्या आणि पक्षाशी प्रामाणिक राहिलेल्या महिला कार्यकर्त्यांचाही विचार व्हावा, यासाठी दोन्ही पक्षात एक गट सक्रिय झाला असून, पक्षश्रेष्ठींवर त्यासाठी दबाव आणला जात आहे. पक्षश्रेष्ठी महिलांच्या पदरात स्वीकृतचे दान टाकणार काय, याकडे आता लक्ष लागून असणार आहे. (प्रतिनिधी)
स्वीकृत सदस्यत्वासाठी महिलांना मिळणार संधी?
By admin | Published: March 03, 2017 1:53 AM