नाशिक : एनआरसी, 'सीएए'सह अल्पसंख्याक समाजाच्या विरोधातील विविध निर्णयामुळे भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या २२ पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत प्रदेश सचिव इमरान चौधरी यांनी शनिवारी(दि.१८) दिली.भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या प्रदेश सचिव इमरान चौधरी यांच्यासह भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या माजी शहराध्यक्ष अहेमद काझी, शहर उपाध्यक्ष वसीउल्लाह चौधरी, शहर सचिव दानिश वार्सी, अब्दुल खान, राजेश सोनार, नंदुर इंगळे, प्रचिन भिन्ने, नसिम चौधरी, तौफिक सय्यद, अक्बर खान, रफिक अंसारी,मुबारक खान, जावेद खान, महेराज शेख, बादशाह खान, इस्माईल चौधरी, समीर सिद्दीकी, रियाज चौधरी, हसन जहीर व सलीम खान यांनी यावेळी आपल्या पदाचे राजीनामे देत भाजपचा जाहीर निषेध केला.चौधरी यांनी सांगितले की, 'सीएए'कायदा लागू झाला, त्यानंतर 'सीएए' आणि 'एनआरसी'बाबत जनसामान्यात असलेल्या रोषाची माहिती पक्ष श्रेष्ठीसह प्रदेशाध्यांना दिली होती. गेल्या काही महिन्यात भाजप सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. ट्रिपल तलाक, कलम ३७०, मुस्लिम आरक्षण न देणे, 'सीएए'आणि 'एनआरसी'असे निर्णय हे एका विशिष्ट समाजाच्या विरोधात आहे. यामुळे पूर्वी जो समाज या पक्षाच्या जवळ आणण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. ते प्रयत्न अयशस्वी होत आहे. सीएए आणि एनआरसी हे कायदे भारतीय राज्यघटनेच्या विरोधात आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हे सामूहिक राजीनामे अल्पसंख्याक आघाडी प्रदेशाध्यक्षांसह भाजपचे शहराध्यक्ष गिरीष पालवे यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.