नाशिक : गॅस सिलिंडर नोंदणी करणारी भ्रमणध्वनी कंपनीची सेवा बदलणाऱ्या तेल कंपन्यांच्या खटाटोपामुळे ग्राहकांना भोगावा लागणारा मनस्ताप काहीसा कमी होण्याची चिन्हे असून, यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच तेल कंपनीने पर्यायी भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. तथापि, सलग चार दिवस नोंदणी ठप्प झाल्यामुळे वितरकांकडे ग्राहकांच्या रांगा लागू लागल्या आहेत. हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या गॅस ग्राहकांसाठी पूर्वी भ्रमणध्वनीवर लघुसंदेशाद्वारे नोंदणीची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु आता तेल कंपनीने ही सेवा भारत दूरसंचार निगमकडून घेण्याचे ठरविल्यामुळे यापूर्वी देण्यात आलेल्या क्रमांकावरून गॅस नोंदणी पूर्णपणे बंद पडली. तेल कंपनीने केलेल्या या बदलाची काहीएक कल्पना नसलेल्या भ्रमणध्वनीवर सातत्याने संपर्क साधूनही नोंदणी होत नसल्याने ग्राहकांनी गॅस वितरकांकडे संपर्क साधला असता, त्यांनाही याची कल्पना नसल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर दूरसंचार कार्यालयाने ९४२०४२३४५६ हा क्रमांक गॅस नोंदणीसाठी उपलब्ध करून दिला आहे. तसेच पूर्वीच्या क्रमांकावरही नोंदणी करण्याची सोय आहे. असे असले तरी, गेल्या चार दिवसांपासून नोंदणी न झाल्याने वितरकांकडे ग्राहकांची प्रतीक्षा यादी वाढली आहे. त्यामुळे ग्राहकांना आठ ते दहा दिवस गॅससाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. (प्रतिनिधी)
गॅस सिलिंडर नोंदणीसाठी खटाटोप
By admin | Published: February 04, 2015 11:56 PM